आस्वाद

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा,
जरी असला आज, माझा संसार हसरा….
बंद कुपी असते एक प्रत्येकीच्या मनांत,
कुणाच्याही नकळत गुपित दडवले त्यांत.
लहानपणीच्या खेळात केलेली लबाडी,
सांगण्यापेक्षा दडवण्यात आहे जास्त गोडी.
अक्काच्या ताटातील लांबवली आंब्याची फोड,
लक्ष वेधून तिकडे दादा आला, दार उघड.
व्यवस्थित केलेली आईच्या नऊवारीची घडी, मोडली कित्येकदा मी खेळतांना बाहुलीची साडी.
आवडत नाही आमटी, दिली छोटीच्या वाटीत टाकून,
कळू नये तिला म्हणून ठेवली नीट झाकून.
परीक्षा उद्या आक्काची, सायन्सची वही गायब, तिचा आकांत,
माझ्या कपाटात तिची वही विसावली निवांत.
पाणी द्यायचे पाहुण्यांना, हा माझा शिरस्ता,
आज पाणीच आले नाहीअसे म्हणून त्यांना दाखवला बाहेरचा रस्ता.
नंतर त्यासाठी आईचा खाल्ला किती मार,
आईची आवडीची म्हण खायला काळ, भुईला भार
घाईघाईत छोटीला कितीदा फ्रॉक घातला उलटा,
त्यासाठी आईचा खाल्ला मोठा धपाटा.
नव्हते कामात मन, बाहेर सारखे लक्ष,
नाकावरच्या कडचीची खूण आहे त्याची साक्ष.
दादाच्या नकळत मी आणि आक्काने दिलेला त्याच्या मित्राला शिरा,
का कोण जाणे, तो मित्र दिसला नाही पुन्हा आमच्या घरा.
आईने एकदा परसदारी हळद ठेवली दळून,
त्यात मी अभिमानाने कु. नांदापूरकर लिहिले कोरून.
तो हळदीचा हात पुसला बाबांच्या टॉवेलला पांढर्‍या,
आक्का आणि छोटी झाल्या कावर्‍याबावर्‍या.
विशे, तू मार खाणार नक्की आक्का वदली,
मीही ती खूणगाठ मनाशी पक्की केली.
काय करावे सुचेना, गेले बाबांच्या ऑफिसात,
बाबांचे हेल्थ युनिट होते त्यांच आवारात.
5 वाजता बाबांचे धरुनी बोट, केला घरांत प्रवेश,
संगे बाबांना पाहून, उतरला आईचा आवेश.
आंघोळीला जाताना बाबांना दुसरे दिवशी,
प्रताप समजला माझा, रागावले मला खाशी.
प्रसंग आठवला जरी, आता येते हसू,
अशा कितीतरी गमती, लागतात मनांत नाचू.
आम्ही बहीण-भावंडे चार, चौघांच्या वेगळ्या रीती,
योगायोगाने जवळच राहिलोत औरंगाबादला आजमिती. वहिनी आली घरांत, सामावली आमच्यांत,
नाही पडले अंतर कधी आम्हां बहीणभावात.
कुपी उघडली आठवणींची, दरवळला सुवास,
भ्रातृछाया ही वास्तू आहे आमच्यासाठी खास.
त्या वास्तूत अजूनही जपलाय मी तो माझा कोपरा,
त्यापुढे फिका पडतो, संसार हा सारा
संसार हा सारा.
असाच एक कोपरा असेल माझ्या लेकींच्या मनांत,
जपायचं आहे मला त्याला अगदी आत आत.
आता त्या आहेत तरुण आणि उद्योगी,
त्यांच्या बिझीपणाच्या खुणा दिसत आहेत जागोजागी.
पण जेव्हा होतील त्या निवांत …
येतील माझ्यासारख्या साठीला,
त्यांना नको का, हा कोपरा,
त्यांच्या हो गाठीला. त्यांच्या हो गाठीला..

Dagger and itch

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार

भारत हा विकसनशील देश आहे. अवघ्या सत्तर एक वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला सुरुवातीलाच पंडित जवाहरलाल…

3 hours ago