देवयानी सोनार
मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच त्यांना घडविण्यात पित्याचा वाटा असतोच; पण त्याहीपेक्षा आईचे महत्त्व मात्र अनन्यसाधारण आहे. माझ्या मुलांना घडविण्यात माझ्यापेक्षा पत्नी म्हणजेच मुलांच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज माझी दोन्ही मुले उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. हे पाहून अभिमानाने ऊर भरुन येतो.. वडिलकीच्या भूमिकेतून मुलांना कसे घडविले याविषयीच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी…
पोलिसांच्या मुलांचे चांगलं शिक्षण होणे अवघड काम आहे. करिअरमधील पहिली काही वर्षे फिल्ड पोस्टिंग असतेच. फिल्ड पोस्टिंगमध्ये गुन्हेगारी जगतातल्या घडामोडींनुसार दिनचर्या असते. ऑफिसच्या वेळेनुसार कोणताही फिल्डमधला अधिकारी काम करू शकत नाही. लग्नानंतर खासगी कंपनीत डिझाइन इंजिनिअर असलेल्या पत्नीला नोकरी सोडण्यास सांगितले. माझ्या सांगण्यानुसार तिनं नोकरी सोडली आणि ते किती बरं झालं हे आता समजते. मुलांच्या शिक्षणाशी निगडित आणि शिक्षणेतर ऍक्टिव्हिटीजबाबतचे बहुतेक निर्णय तिचेच होते. मुंबई पोलीसमध्ये बर्यापैकी रविवार फ्री मिळायचा. दर रविवारी परीक्षा नाही तर क्लास किंवा कराटे, क्रिकेट असे काहीतरी चालूच असायचे. माझे काम ड्रायव्हिंगचे. शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा एखाद्या शिक्षकाला अगदी क्वचितच भेटलो असेन. चौथ्या इयत्तेत मिडल स्कूल स्कॉलरशिपमध्ये दोन्ही मुले पास झाली. मुलांचे शेड्युल्ड एकदम टाइट होते. मुले याही सगळ्या परीक्षा पास झाले. यश आठवीमध्ये आणि जाई सातवीत आले. एनसीईआरटीची नॅशनल टॅलेंट सर्च म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोध ही पुढची परीक्षा होती. एन.टी.एस. स्कॉलरशिप हा शिक्षणक्षेत्रातला मानाचा तुरा आहे, असे मानले जाते. आम्ही राहायला होतो कांदिवलीला आणि दर रविवारी एन.टी.एस.चा क्लास असायचा. वझे केळकर कॉलेज मुलुंडला. त्यावेळी माझे पोस्ंिटग इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होते. मी पोलीस अधिकारी आहे हे कुणालाही माहीत नव्हते आणि जाणीवपूर्वक कुणाला सांगितलेसुद्धा नव्हतं. वझे केळकर कॉलेजमध्ये कोळी नावाचे प्रोफेसर होते. त्यांच्याकडे एन.टी.एस. कोचिंगच्या समन्वयाचे काम होते. मी असा एकच पालक होतो की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनव्यतिरिक्त कधी काहीही बोलायचो नाही. यश राज्यस्तरावर दिनांक 8 नोव्हेंबर 2009 रोजी झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत पास झाला. अजूनही मी पोलीस अधिकारी आहे हे कुणालाही माहीत नव्हते. का कुणास ठाऊक एके दिवशी कोळी सर पालक बसायचे त्या वर्गात आले आणि मला म्हणाले की, सालाबादप्रमाणे त्यावर्षीसुद्धा एन.टी.एस. पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे. मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे ठरलं आहे. मला हे अनपेक्षित होतं. पोलीस उपायुक्त म्हणून मला बर्याच समारंभांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात यायचं. यावेळी मात्र कुणालाही मी काय करतो वगैरे माहीत नसताना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आल्याने मला फार आश्चर्य वाटले. मी आनंदानं होकार दिला हे वेगळे सांगायला नको. कार्यक्रमाच्या दिवशी यशस्वी झालेली मुले, त्यांचे पालक, सध्या प्रशिक्षण घेत असलेली मुले, त्यांचे पालक, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक यांनी हॉल भरला होता. मुलांना आणि विशेषत: यशला बक्षीस देताना अभिमानाने माझा ऊर भरून आला होता. त्या दिवशी मी अगदी मनापासून आणि खरंखरं भाषण केलं. अगदी इतकं की कोळी सर कार्यक्रमानंतर मला म्हणाले की, आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा त्यांचा निर्णय अगदी योग्य होता. विशेष म्हणजे, अजूनही कुणाला मी पोलीस अधिकारी आहे हे माहीत नाही. मुलांचे कराटे क्लासेसमध्ये ब्राऊन बेल्ट झाल्यावर रीनाला मी विनोदाने म्हटलं की, आता ब्लॅक बेल्ट वगैरेला बसवू नको. उगीच कुठे भांडण झालं आणि मार खायला लागला तर ब्लॅक बेल्ट होता तरी असे कसे झालं म्हणून वाईट वाटायला नको. एक महिन्याच्या समर कॅम्पसाठी पाठविलं होतं. मुलांना एक महिना दूर ठेवले. मुले मजेत राहिली. प्रत्येक रविवारी सांगलीला मुलांना भेटायला जायचो. यशला दहावीला 94 टक्के व जाईला 93 टक्के मार्क आले. बारावीनंतर यश माटुंग्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगला तर जाई तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ येथे एम.बी.बी.एस.ला आहे. सगळे श्रेय मात्र त्यांच्या आईचे आहे. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.