अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सर्वत्र टीका होताच त्यांनी राज्यातील शेतकरी वर्गाची माफी मागितली आहे. बोलण्याच्या ओघात अनावधानाने आपल्याकडून बोलले गेले. शेतकरी आपल्या वक्तव्याने दुखावले गेले आहेत, शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा आपला कोणताच हेतू नव्हता असे कोकाटे म्हणाले.

कोकाटे काय म्हणाले होते?

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते नाशिक तालुक्यात बांधावर गेले होते त्यावेळी विचारला होता. यावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच सुनावले होते. , “जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्ज भरायचे नाही. मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करते. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते. कोकाटे यांच्या या वक्तव्याने शेतकरी संतप्त झाले होते, किसान सभेने कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली होती. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकाटे यांच्या विधाना बाबत शेतकरी वर्गाची माफी मागितली होती,

यापूर्वी ही केले होते वादग्रस्त वक्तव्य

आपल्या फटकळ बोलण्यामुळे कोकाटे हे प्रसिद्ध आहेत, यापूर्वी देखील त्यांनी पीक विमा बाबत बोलताना भिकारी पण 1 रुपया घेत नाही आणि शेतकऱ्यांना1 रुपयात पीकविमा दिला जातो असे विधान केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *