अखेर बसस्थानकातील खड्डे बुजवले

वाहतुकीसाठी दोन्ही गेटचा वापर सुरू

निफाड : तालुका प्रतिनिधी
निफाड बसस्थानकातील
पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मोठमोठे खड्डे पडल्याने बसचालकांना आणि खासगी वाहने पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने दैनिक गांवकरीने याबाबत ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत काल गुरुवारी बसस्थानक प्रवेद्वारासमोरील खड्डे बुजविण्यात आल्याने आणि पश्चिमेकडील बाजूने बस वाहतूक सुरू केल्याने प्रवासी वाहनचालक आणि परिसरातील व्यावसायिकांनी बसस्थानकप्रमुख व गांवकरीचे आभार मानले आहे.
बसस्थानकासमोर पडलेले खड्डे बुजवावे आणि पश्चिम बाजूकडील गेटने बस बाहेर जावी, यासाठी नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनदेखील आगारप्रमुख त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर निफाड येथील सामाजिक कार्यकर्ते विजय धारराव, विजय झोटिंग यांच्यासह नागरिकांनी बसस्थानकात अर्ज देत खड्डे बुजविण्याची मागणी करीत याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. बसस्थानकातील खड्डे बुजविल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकत प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. याप्रसंगी विजय धारराव, विजय झोटिंग यांच्यासह, समाधान कुंभार्डे, नवनाथ धारराव, हरीश कापडी, विजयकुमार बनवट, स्वप्नील सोनवणे, पिनू कुंदे, कमलाकर (बापू) कुंदे, संजय गोळे, पिंटू मोगरे, प्रवीण शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.

                                                            गांवकरी इम्पॅक्ट

अंमलबजावणी सुरू

दैनिक गांवकरीनेदेखील त्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर काल बसस्थानकप्रमुख सोमनाथ गवळी यांनी याची दखल घेत प्रवेशद्वाराजवळ असणारे मोठमोठे दगड हटवत या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून सर्व खड्डे व्यवस्थित बुजविले आहे. तसेच सर्व बसचालकांना सूचना देत बस पूर्व गेटमधून स्थानकात आणावी. पश्चिम गेटने बाहेर न्यावी, अशा सूचना दिल्याने कालपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *