रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब

नाशिकरोड : प्रतिनिधी
रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1 ते 19 जून या कालावधीत मध्य रेल्वेवरील दीडशे गाड्यांना दहा ते पंधरा मिनिटे उशीर झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत 98 गाड्यांना उशीर झाला होता. या घटनांत 53 टक्के वाढ झाली आहे, भुसावळ विभागात 149 प्रकरणे नोंदवून दोषी 119 प्रवाशांकडून 42 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे प्रवास सुरक्षित आणि विनाविलंब व्हावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे डब्यातील आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग-एसीपी) विनाकारण ओढू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
रेल्वेने उपनगरी तसेच मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंगची सुविधा फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अलीकडे या सुविधेचा वापर अनेक वेळा चुकीच्या कारणांसाठी केला जात आहे. तसे केल्यास रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. चुकून चेन ओढणे, प्रवासी वेळेत ट्रेनमध्ये चढू न शकल्यामुळे चेन ओढणे, मोबाईल फोन खाली पडला म्हणून चेन ओढणे, रेल्वेगाडीला एखाद्या स्थानकात थांबा नसेल तर तेथे उतरण्यासाठी चेन ओढणे आदी किरकोळ कारणे असतात.
या सुविधेचा चुकीचा वापर झाल्यास त्याचा फटका केवळ संबंधित गाडीत प्रवास
करणार्‍यांंनाच नाही तर त्यानंतर येणार्‍या इतर गाड्यांनाही बसतो. एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी शेकडो प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मुंबई विभागात, वाहतुकीत मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्या दोन्हींचा समावेश आहे. उपनगरीय गाड्या उशिराने धावत असल्याने आणि प्रवाशांना स्थानकांवर गैरसोय होत असल्याने कॅस्केडिंगचा परिणाम प्रचंड झाला आहे. भुसावळ विभागात 1 ते 19 जून 2025 दरम्यान 26 प्रकरणे घडली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तेरा प्रकरणे होती. नागपूर विभागात 1 ते 19 जूनदरम्यान 52 प्रकरणे होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 28 प्रकरणे होती. मुंबई विभागात 1 ते 19 जूनदरम्यान 57 प्रकरणे होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 41 प्रकरणे होती. 1 ते 20 जून या कालावधीत 666 एसीपी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, ज्यातून 463 प्रवाशांवर खटला चालवण्यात आला आणि एक लाख 70 हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे.
भुसावळ विभागात या कालावधीत 149 प्रकरणे नोंदवून दोषी 119 प्रवाशांकडून 42 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

रेल्वेचे आवाहन

रेल्वे प्रवाशांनी किरकोळ कारणांसाठी चेन ओढू नये, इतर प्रवाशांची गैरसोय करू नये. प्रवाशांनी आपल्या गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वी स्थानकावर पोहोचावे, तसेच मर्यादित सामान सोबत ठेवावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी स्टेशन मॅनेजर कार्यालयात उपलब्ध असलेल्या बॅटरीवर चालणार्‍या गाड्या वा व्हीलचेअर यांचा वापर करून वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचावे. यामुळे किरकोळ कारणांसाठी चेन ओढण्याची गरज भासणार नाही असे रेल्वेने कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *