रायते शिवारात प्लायवूड कंपनीला आग; जीवितहानी टळली
येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील रायते शिवारात रविदीप इंडस्ट्रीज या प्लायवूड तयार करणार्या कंपनीला शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
येवला तालुक्यातील रायते शिवारातील विष्णू खैरनार यांच्या मालकीची ही प्लायवूड कंपनी आहे. या कंपनीला आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे साहित्य आणि यंत्रसामग्री जळून खाक झाली. शुक्रवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास कंपनीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. दोन एकर परिसरात पसरलेल्या या कंपनीत हजारो टन लाकडाचा साठा, कच्चा माल, रसायने, मशिनरी ऑइल आणि इंधन होते. लाकूड आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच संपूर्ण कंपनी आगीच्या विळख्यात सापडली.
दरम्यान, कंपनीला लागलेली आग प्रचंड होती. आगीचे रौद्ररूप धारण केल्याने ती विझविण्यासाठी येवल्यातील अग्निशमन दलासह मनमाड, विंचूर, निफाड, कोपरगाव, पिंपळगाव बसवंत आदी शहरांतील अग्निशमन दलांना पाचरण करावे लागले. स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. मात्र, लाकडाचा मोठा साठा असल्याने आग धुमसत होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या अनेक
फेर्या होऊनही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे कंपनीतील सर्व साहित्य, प्लायवूड तसेच कच्चा माल खाक झाला.
कंपनीत सुमारे 30 पेक्षा जास्त कामगार काम करतात. आग लागली तेव्हा वेळीच सतर्कता बाळगल्याने सर्व कामगार सुरक्षित बाहेर पडले. मात्र, कारखान्यातील कोट्यवधींंची यंत्रसामग्री आणि तयार प्लायवूड खाक झाले.
या प्रकरणाची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे एपीआय सागर कोते, गणेश सांगळे, दीपक मुंडे व त्यांच्या पथकाने तातडीने धाव घेतली. परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली व गर्दीवर नियंत्रण मिळवले. संबंधित आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे लागली की अन्य काही कारणाने, याचा तपास आता शासकीय यंत्रणेकडून केला जात आहे. मात्र, भीषण आगीमुळे कंपनीचे मालक उद्योजक विष्णू खैरनार यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Fire in Yeola taluka causes loss worth crores