35 हजारांचे नुकसान; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील साळसाने शिवारात एका शेतकर्याने जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या मक्याच्या चार्याला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. आगीत सुमारे 11 ट्रॅक्टर ट्रॉली भरेल इतका चारा खाक झाला. शेतकर्याचे अंदाजे 35 हजारांचे नुकसान झालेे. याप्रकरणी पाच संशयितांविरोधात चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, साळसाने येथील ज्येष्ठ शेतकरी प्रभाकर कारभारी ठाकरे (वय 77) यांनी आपल्या शेतातील घरासमोर जनावरांसाठी मक्याचा चारा रचून ठेवला होता. सोमवारी (दि. 15) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या चार्याच्या गंजीला आग लावली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि साठवून ठेवलेला सर्व चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत सुमारे 11 ट्रॅक्टर ट्रॉली मक्याचा कडबा जळाल्याने ठाकरे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी प्रभाकर ठाकरे यांनी चांदवड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केलो. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू गायकवाड तपास करीत आहेत.
chandvad
Fire set fire to corn