पुण्यात राज ठाकरे यांचा सज्जड दम
पुणे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकार्यांच्या बैठकीत पक्षातील निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा… इतके दिवस काय केले दाखवा… आणि जे काम करत नाहीत त्यांना थेट काढून टाका, या शब्दांत राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकार्यांना चांगलाच सज्जड दम
दिला.
पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः पक्षाच्या संघटनात्मक कामावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरेंनी एका वरिष्ठ पदाधिकार्याला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले.
‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश उर्फ पिट्या परदेशी, हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी थेट विचारलं की, छातीठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाइमपास करतो. एकाच ठिकाणी कुठे तरी राहा, असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना झापले.
काम न करणार्यांना काढून टाका
राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना सज्जड दम दिला. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, असे म्हणत राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना फटकारले. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत? असा प्रश्न राज ठाकरेंनी पदाधिकार्यांना विचारला. तर ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेशदेखील राज ठाकरेंनी दिले. या फटकारणीनंतर सभागृहातील अनेक शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी गप्प बसले, काहींनी तर माना खाली घातल्याचे पाहायला मिळाले.