आर्थिक वादातून गोळीबार
नाशिक : मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर गोविंदनगर बोगद्याजवळ बुधवारी (दि.४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चौघा मित्रांमध्ये आर्थिक वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर गोळीबार करणारे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अविनाश विक्रम टिळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश टिळे आणि सुनील चोरमारे यांच्यात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता इंदिरानगर बोगद्याजवळ पैशांच्या देवाण घेवाण घेवणीवरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर भांडण झाल्याने संशयित सुनील चोरमारे व त्याचे साथीदार जगु सांगळे व राज जोशी यांनी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात अविनाश टिळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सुनील चोरमारे, जग्गू सांगळे व राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.