पंचवटीतील फुलेनगरमध्ये गोळीबार; एक जण गंभीर जखमी,प्रकृती चिंताजनक
सिडको : दिलीपराज सोनार
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात सोमवारी रात्री एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या समर्थक असलेल्या कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सागर जाधव असे या घटनेतील जखमीचे नाव असून, त्यांच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गालातून घुसलेली गोळी मानेजवळ अडकली असून प्रकृती गंभीर आहे.सागर जाधव असे जखमीचे नाव आहे
ही घटना जुन्या वादातून घडल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणात नेमका कोणाचा सहभाग आहे, हे शोधण्यासाठी पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्ध घडले होते. त्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून, या गोळीबारात त्याच टोळीतील काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग हे याच घटनेची वाट पाहत होते काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.