पवारवाडी पोलिसांची कारवाई, मुद्देमाल जप्त
मालेगाव : प्रतिनिधी
पवारवाडी पोलिसांनी मालेगाव शहर, तालुका, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल 14 गुन्ह्यांतील 5 संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 चोरीच्या दुचाकी आणि एक ट्रॅक्टर असा 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल खताळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून शहेजाद सय्यद एकबाल आणि शेख युसूफ शेख अयुब (दोघे राहणार मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी चौकशीत 30 मोटारसायकली आणि एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या साथीदारांमध्ये शेख नाजीम अब्दुल हमीद (रा. मालेगाव), प्रल्हाद प्रमोद वाघ आणि देवीदास नानाजी वाघ (दोघे रा. सवंदगाव) यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात 18 लाखांच्या 30 दुचाकी आणि 3 लाखांचा ट्रॅक्टर आहे. या कारवाईमुळे पवारवाडी, किल्ला, छावणी, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, पंचवटी (नाशिक शहर) आणि धरणगाव (जळगाव) पोलीस ठाण्यांमधील 14 गुन्हे उघडकीस आले.
आरोपींना पवारवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 190/2025 आणि 196/2025 अंतर्गत एन.एस. कलम 303(2) नुसार हजर करण्यात आले आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पवारवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि किरण पाटील, हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, नीलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार आणि सचिन राठोड यांच्या सहभागाने यशस्वी केली.