नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार पालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवली. दरम्यान, गुरुवारी (दि.4) राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी राज्यभरातील महापालिका आयुक्तांंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यात विशेषत: प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींबाबत माहिती घेतल्याचे समजते आहे.
दरम्यान, राज्यातील 226 नगरपालिका आणि 38 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईसह 29 महापालिका आयुक्तांची बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकीत प्रारूप मतदार याद्या आणि निवडणूक तयारीबाबत आढावा घेतला गेला. महापालिका आयुक्तांची निवडणुकीची तयारी लक्षात घेऊन आयोग पुढच्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम तयार करण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या संदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्याची मुदत बुधवारी संपली. दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख 10 डिसेंबर आहे, तर 22 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होतील. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेली बैठक सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यास संपली. यावेळी नाशिक महापालिका प्रशासनाने आपली भूमिका मांडताना म्हटले की, 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान शहरातून एकूण 9 हजार 447 हरकती आल्या. त्यातील पाच हजार हरकती तपासण्यात आल्या असून, उर्वरित हरकती लवकरात लवकर तपासल्या जातील. आलेल्या हरकतींचा निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल 31 पथकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक हरकत तपासली जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष त्या-त्या प्रभागात जाऊन पाहणी करून आलेल्या हरकतीची खात्री केली जात आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री रजेवर असल्याने अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर व प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित होते.
मतदार याद्यांची साडेदहा लाखांची विक्री
महापालिकेने 31 प्रभागांची मतदारयादी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. दोन रुपये प्रतीप्रमाणे यादी घ्यावी लागते. आतापर्यंत 187 मतदार याद्यांची विक्री झाली असून, त्यातून पालिकेला 10 लाख 32 हजार 767 मिळाले आहे.
हरकतीसाठी पुन्हा मुदतवाढ?
मतदारयादी दुरुस्त करण्यास महापालिकांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यास दोन ते तीन दिवस वाढवून देणार आहे. हरकतींची संख्या अधिक असल्याने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यास अडचणी येऊ शकतात. हे पाहता आयोगाकडून मुदतवाढ दिली जाणार का? हे पहावे लागणार आहे.