अयोध्येतील राम मंदिरावर आज ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला मोदींची उपस्थिती

अयोध्या :
उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी नवीन इतिहास लिहिला जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा विजय ध्वज फडकवण्यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहेत.
ध्वजात सूर्याचे प्रतीक असेल, जे भगवान रामाच्या सूर्यवंशी वंशाचे आणि दैवी ऊर्जेचे प्रतीक आहे. पॅराशूट उत्पादनात विशेषज्ज्ञ असलेल्या अहमदाबाद येथील एका कंपनीने हा ध्वज डिझाइन केला आहे. 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब असा या ध्वजाचा आकार आहे. हा ध्वज तीन थरांचा असून, तो रेशमी सिल्कचा आहे आणि त्याचा रंग पितांबरी आहे. हा रंग सूर्योदयापूर्वी क्षितिजावर दिसणार्‍या लालसर रंगासारखा आहे. सूर्य, पाऊस आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी हा विशेष पॅराशूट कापड आणि रेशमी धाग्यांपासून बनवला आहे. या ध्वजावर हाताने नक्षीकाम करून भगवान रामाचे राजचिन्ह असलेले कोविदार वृक्ष, सूर्यदेवाचे प्रतीक आणि त्या सूर्याच्या मध्यभागी ओंकार हे चिन्ह बनवण्यात आले आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी एकूण सहा कारागिरांनी मेहनत घेतली आहे. हा समारंभ सुमारे चार तास चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *