निओ मेट्रोमुळे एका उड्डाणपुलाच्या कामाला फुली ?
नाशिक : प्रतिनिधी
बहुचर्चित त्रिमूर्ती व मायको सर्कल येथील दोन्ही उड्डाणपुलापैकी एका पुलाच्या कामाची आवश्यकता तपासली जात असल्याने मायको सर्कल येथील उड्डाणपुलाचे काम थांबवण्याचे आदेश आले आहेत. दरम्यान या पुलाचे बांधकाम थेट निओ मेट्रोच्या मार्गात येत असल्याने कायमस्वरुपी या प्रस्तावित उड्डानपुलाचे काम थांबवले जाणार आहे. पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मात्र उंटवाडी उड्डाणपुलाचे काम करण्यास सध्या असहकार दर्शवल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने या कंपनीला काम सुरू करण्यासाठी दोनदा नोटीस दिली आहे.
या उड्डाणपुलामुळे दोनशे वर्षाचे वटवृक्ष व इतर शेकडो झाडे तोडली जाणार असल्याचे समोर येताच याविरोधात नाशिक शहरात वृक्षप्रेमींनी मोठे आंदोलन केले होते. त्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना घ्यावी लागली होती. त्याचवेळी त्यांनी विकासासाठी झाडे तोडली जाणार नसल्याचे सांगत पुलाच्या आराखड्यात बदल करणार असल्याचे आश्वास दिले होते. सन 2016-17 मध्ये या पुलासाठीचा प्रस्ताव होता. त्यावेळ्चे वाहतूक धोरण कसे होते, सध्या खरोखरच हा उड्डाणपूल आवश्यक आहे का हे तपासले जाणार आहे.
या पुलाच्या मार्गात निओ मेट्रोचा मार्ग येत असल्याने उड्डाणपुलाचे काम होणे अवघड आहे. या दोन्ही उड्डाणपुलाचे काम एकाच कंपनीला मिळाले होते. आता मात्र एक उड्डाणपुलाचे काम थांबवल्याने पीबीए या कंपनीकडून दोन्ही उड्डानपुलाचे कामे देण्याची मागणी केली जात आहे. ज्यावेळी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावेळी मायको सर्कल व उंटवाडी असे दोन्ही प्रत्येकी 120 कोटींचे एकूण 240 कोटीचे उड्डाणपूल बांधण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र आता एका उड्डाणपुलाचे काम रद्द होत असल्याने ही कंपनी काम करण्यास नाटक करत असल्याचे चित्र आहे. अद्याप या कंपनीकडून त्रिमूर्ती चौक ते दिव्या शेड या उड्डाणपुलाच्या कामासंबंधी कोणतेही डिझाइन, प्लॅन सादर केलेला नाही.
पालकमंत्र्यांना नको होता उड्डाणपूल
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालिकेत बैठक घेत कामाचा आढावा घेतला असता यावेळी त्यांनी प्रस्तावित उड्डानपुलाच्या कामाची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष यापूर्वी ना. भुजबळ यांनी आवाश्यकता नसेल तर उड्डाणपूल कशाला असे म्हटले होते. दरम्यान त्या पुलाच्या कामात तब्बल 574 वृक्ष येत होती.
उड्डाणपुलावरुन राजकारण जोरात
या उड्डानपुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी वारंवार केला होता. परंतु त्यांच्या या आरोपाची दखल खुद्द त्यांचाच पक्ष घेत नसल्याचे चित्र होते. तरीही स्थायीच्या सभेत शहाणे यांच्याकडून कोणासाठी उड्डाणपूल केला जातोय असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता.