पूरनियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यरत

सात तंत्रज्ञ, संदेशक 24 तास राहणार अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
धरणक्षेत्रात पावसामुळे अचानक वाढणार्‍या पाण्यावर नियंत्रण व नियोजनासाठी जलसंपदा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे पूरनियंत्रण कक्ष येत्या 1 जूनपासून कार्यान्वित करण्यात येेणार आहे. धरणात वाढणारे पाणी व वाढत्या पाण्याच्या विसर्गाची माहिती जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग यांना तातडीने कळवून पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे व कमीत कमी हानी होण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होईल.
धरणातून सोडलेल्या विसर्गाबरोबरच अतिवृष्टी, ढगफुटी, धरणफुटी, अशा घटनांबद्दलही निरीक्षणे अत्यंत बारकाईने नोंदवली जात आहेत. कायदा नियंत्रण व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि जीवितहानी टाळण्याच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यासाठी 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत 24 तास पूरनियंत्रण कक्ष दरवर्षी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात कार्यान्वित केला जातो.
यंदा दमदार पाऊस होईल, असे हवामान खात्याचे भाकीत आहे. या पार्श्वभूमीवर पूरसदृश परिस्थिती जवळपास सर्वच ठिकाणी निर्माण झाली तर पूरनियंत्रण कक्षामार्फत संबंधित विभागात पाण्याची   सद्यःस्थितीबद्दल इत्यंभूत माहिती पुरवली जाणार आहे. त्यामुळे पूरनियंत्रण कक्ष पावसाळ्यात कायम अलर्ट मोडवर राहील.
येत्या 1 जून ते 31 ऑक्टोबर कालावधीत जलसंपदा विभागाचा पूरनियंत्रण कक्ष सलग 24 तास कार्यरत राहील. सकाळी 6 ते दुपारी 2, दुपारी 2 ते रात्री 10, तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या तीन शिफ्टमध्ये दिवसरात्र देखरेख राहील. एकूण सात तंत्रज्ञ व संदेशक 24 तास पूरनियंत्रण कक्षात कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यातील भागात झालेल्या पावसाची स्थिती, त्यातून धरणक्षेत्रात किती पाणी आलेे, पातळी, सांडवा, विसर्ग, एकूण पर्जन्य, कालवे विसर्ग, पाण्याच्या सद्यःस्थितीबद्दल माहिती संकलित करून जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, मंत्रालय, जलसंपदा (छत्रपती संभाजीनगर) आदी ठिकाणी सकाळी पाठवली जाते. धरणातून विसर्ग केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक पोलीस आयुक्तालय व ग्रामीण यांना वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे.

पावसामुळे धरणक्षेत्रात पाणीपातळी वाढते. त्यानुसार दरवर्षी पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जातो. येत्या 1 जूनला कक्ष कार्यान्वित होईल. पाऊस अधिक कालावधीपर्यंत असेल तर 31 ऑक्टोबरनंतरही कक्ष सुरू ठेवण्यात येईल.
– सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *