‘फार फार तर वारा
बाहेरून येईल
पण फुलून तर
आतूनच यावे लागते..’
कविवर्य संजय चौधरी यांच्या कवितेच्या वरील ओळी खूप आवडल्या. खरंच.. फुलणे हा तर फुलाचा प्राकृतिक धर्म आहे..कळी फुलली की तिचे सौंदर्य अधिकच खुलते.तसंच माणसालाही आतून आतून फुलून येता आले पाहिजे..फुलण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल किंवा नसेलही पण मनात मात्र आस हवी फुलण्याची..उमलण्याची..!!
आसक्ती हवी की हो मला आनंदी राहायचेच आहे..मग वार्याची तरी का वाट पाहावी बरं..? तुम्ही ती बांधावरची रानजाई पाहिली आहे का..? कितीही ऊनवारा पाऊस असला तरी ती बहरत असते..तिला कुणी पाणी नाही घातले तरी ती जगते..जमिनीतल्या ओलाव्याने तग धरते..काही व्यक्ती देखील अशाच असतात..त्यांना आयुष्यात अभावानेच प्रेम कोडकौतुक मिळत असते तरी देखील ते आनंदाच्या बिया वाटत फिरतात..स्वतः आनंदी तर असतातच, पण इतरांच्या जीवनात देखील आनंद परत जातात..आजूबाजूला खुपशी नकारात्मक माणसे असतात ज्यांच्याशी सततच जुळवून घ्यावे लागते..जुळवून घेतात ते कारण त्यांचे अंतःकरण नेहमीच स्नेहभावनेने फुलून आलेले असतेत्यांना कटुता नको असते..नाही बोलून दाखवत ह्याचा अर्थ असा नसतो की त्यांना काहीच समस्या नाही..इथे प्रत्येकालाच काही ना काही दृश्य अदृश्य व्याप आहेत.
खर्या अर्थाने फुलून येतात ते निसर्गातील ऋतू जे आपल्या आयुष्यात देखील असतात..उन्हाळ्यातील रखरखीत माळरान पावसाळा आला की हिरवेगार दिसते आणि मनाला भुरळ घालते.
कधी सुखाचे सोहळे तर कधी दुःखाचे रडगाणे..कधी ऊन तर कधी पाऊस..कालचे दिवस आज राहत नाही..दिवस बदलतात..अकबर बादशहाच्या हिर्याच्या अंगठीत एक छोटासा कागद असतो ज्यावर लिहिले असते की ये दिन भी निकल जाएंगे ..वाक्य द्विअर्थी आहे की सुखाने मातू नकोस आणि दुःख असल्यास कोलमडू नको..काळ बदलत जातो तसे आपणही काही अंशी बदलण्यास काय हरकत आहे..? तेच ते भोज्जे असले तरी नव्याने त्यांना शिवण्यात मजा आहे.. कंटाळून चालतच नाही..
आपण मात्र जीवनगाणे गातच जायचे आहे.
आणि जीवनाचा मळा फुलवत जायला हवा..मग त्या बहरऋतूला आपण आवडायला लागतो आणि क्षण कसे आनंदाने फुलून येतात..निसर्ग शिकवत असतो आपल्याला असे जगण्याचे तत्वज्ञान ..!!!
Flower…