सगळ्यांना माफ कर आणि जा…

हरीश राणाला कुटुंबीयांकडून अखेरचा निरोप

नवी दिल्ली :
सगळ्यांना माफ करत आणि सर्वांची माफी मागत जा हरीश… आता तुझ्या वेदनांचे फक्त काही क्षण उरले आहेत, या अत्यंत भावुक शब्दांत ब्रह्माकुमारी भगिनींनी हरीश राणा याला अखेरचा निरोप दिला. गेल्या 13 वर्षांपासून वेजिटेटिव्ह स्टेटमध्ये मृत्यूशी झुंज देणार्‍या 32 वर्षीय हरीशला सुप्रीम कोर्टाने इच्छामृत्यूची परवानगी दिली आहे. भारताच्या कायदेशीर इतिहासातील ही पहिलीच घटना मानली जात आहे. शनिवारी सकाळी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
2013 मध्ये चंदीगडमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना हरीश चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो 100 टक्के अपंग झाला. तेव्हापासून तो अंथरुणावरच होता. त्याला नळीवाटे जेवण आणि श्वास दिला जात होता. हरीशचे वडील अशोक राणा यांनी अत्यंत जड अंतःकरणाने सांगितले, आम्ही या वेदनेसोबत 4,588 दिवस काढले आहेत. आपल्या स्वतःच्या मुलाचे दुःख संपवण्यासाठी त्याला मृत्यूकडे पाठवण्याचा निर्णय घेणे, हे त्या वेदनेपेक्षाही भयानक आहे.

एम्समध्ये ’सन्मानजनक’ निरोपाची तयारी
सुप्रीम कोर्टाने 11 मार्च रोजी हरीशच्या पालकांची याचिका मान्य करत त्याला सन्मानपूर्वक मृत्यूचा अधिकार दिला. एम्समधील डॉक्टरांचीएक विशेष टीम आता हरीशचे लाइफ सपोर्ट सिस्टम हळूहळू काढून घेईल. ही प्रक्रिया अत्यंत कायदेशीर आणि वैद्यकीय देखरेखीखाली पार पडेल, जेणेकरून हरीशचा नैसर्गिक मृत्यू होईल.

संपूर्ण प्रक्रियेसाठी 5 ते 6 डॉक्टरांचे पथक
हरीशचे वकील मनीष जैन यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी ’एम्स’नं (-खखचड) 5 ते 6 डॉक्टरांचं एक पथक गठीत केलं आहे.
या पथकातील डॉक्टरांनी सूचित केलं आहे की, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुप्तता राखून पार पाडली जाईल. या संदर्भातील तपशील कोणाकडेही उघड करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांनी पुढे माहिती दिली की, रविवारी (15 मार्च) सायंकाळी 5 वाजता हरीश राणा याला दिल्ली येथील ’एम्स’मध्ये दाखल केल्यानंतर, आता वैद्यकीय पथक या प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत निर्णय घेईल.
डॉक्टरांनी या प्रक्रियेविषयी सविस्तर तपशील दिलेले नाहीत. हा विषय त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षेत्रातील आहे आणि ते त्यानुसारच आपली कर्तव्य पार पाडतील.

हरीश राणा अवयवदान करणार
मिळालेल्या माहितीनुसार, इच्छामरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून सध्या द्रव आहार देण्यासाठी आणि शरीरातील उत्सर्ग बाहेर टाकण्यास मदत करण्यासाठी शरीरात बसवण्यात आलेल्या नळ्या काढून टाकल्या जातील. यामुळे हरीश राणाची शारीरिक स्थिती पुन्हा नैसर्गिक अवस्थेत येईल. त्यानंतर जोपर्यंत तो नैसर्गिकरीत्या जिवंत राहील, तोपर्यंत तो हयात असेल. त्याच्या निधनानंतर त्याचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाईल. हरीश राणा याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे डॉक्टरांचे पथक सर्वप्रथम त्यांच्या सर्व अवयवांची सखोल तपासणी करेल. या तपासणीद्वारे अवयवदानासाठी कोणते अवयव कार्यक्षम आहेत, हे निश्चित केले जाईल. त्यानंतरच पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया सुरू केल्या जातील.

 

 

 

 

 

Forgive everyone and go…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *