उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारलेले माजी महापौर अशोक मुर्तडक व दशरथ पाटील यांनी शिंदेसेनेची वाट धरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पाटील हे त्यांच्या मुलासाठी भाजपकडे आग्रही होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिनकर पाटील यांनी मनसेतून टणकन उडी मारल्याने प्रेम पाटील यांना उमेदवारी मिळू शकली नाही. मुर्तडक यांना थेट उमेदवारी नाकारल्याने त्यांना शिंदेसेनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे.
माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील या दोघांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे या दोघांना पक्षप्रवेशासाठी मुंबईत घेऊन गेले. अशोक मुर्तडक मनसेत असताना महापौर होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. दशरथ पाटील शिवसेना एकसंघ असताना महापौर राहिलेले आहेत. महापालिकेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दोघेही भाजपमध्ये होते; परंतु त्यानंतर आता समीकरणे बदलली असून, दोघेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाले आहेत. अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे ते प्रभाग क्रमांक 5 ड मधून अपक्ष निवडणूक लढवत असून, त्यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे गुरुमित बग्गा व शिवसेना पुरस्कृत मुर्तडक यांच्यात लढत होणार आहे. दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील यांनी यापूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला असून, शिंदेसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रेम पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर दशरथ पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करतील, असा अंदाज होता, तो आता खरा ठरला. दशरथ पाटील यांनी दीड वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांच्या मुलासाठी उमेदवारीचा शब्द दिला होता, असे सांगितले जाते. परंतु, ऐनवेळी दशरथ पाटील यांचे बंधू मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दशरथ पाटील यांच्या मुलाला डावलण्यात आले. भाजपने प्रभाग क्रमांक 9 ड मधून दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दशरथ पाटील यांनी मुलगा प्रेम पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणत उमेदवारी मिळवली. दशरथ पाटील व दिनकर पाटील हे दोघे सख्खे भाऊ असून, दोघांचे कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची दोन्ही मुले एकमेकांसमोर उभी आहेत. प्रभाग 9 ड मध्ये दोघेही आमनेसामने आल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुर्तडक, पाटील यांचा प्रवास
अशोक मुर्तडक यांनी 12 सप्टेंबर 2014 ते 15 मार्च 2017 मनसेत असताना महापौरपद भूषवले. दशरथ पाटील यांनी एकसंघ शिवसेनेत असताना 15 मार्च 2002 ते 18 फेब्रुवारी 2005 पर्यंत नाशिक महापालिकेचे महापौरपद भूषविलेले आहे.
Former Mayor Dashrath Patil, Ashok Murtadak join Shinde Sena