पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे :
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि.6) पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती.
राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरू झाला. सन 2020 च्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, ज्यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांची भेट घेतली होती. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला.

अनुभवी नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ सारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Former Pune MP Suresh Kalmadi passes away

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *