किसान रेलचा महत्त्वपूर्ण वाटा; 93 हजार 300 क्विंटल मालाची वाहतूक
मनमाड : आमिन शेख
मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरील रेल्वे पार्सलच्या माध्यमातून भाजीपाला, फळे यांसह इतर पार्सलच्या अनुषंगाने 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात 4 लाखांपेक्षा जास्त पार्सलच्या माध्यमातून तब्बल चार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. यामध्ये किसान रेलचादेखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. यामध्ये आणखी वाढ होणार आहे. मनमाड हे रेल्वेचे महत्त्वपूर्ण स्थानक असल्याने येथून भारतात सर्वत्र जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत, याच माध्यमातून पार्सलचीदेखील सुविधा उपलब्ध होते.
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून मनमाड जंक्शनची ओळख आहे. मनमाड शहरातून रेल्वेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते जम्मू -काश्मीरपर्यंत प्रवास करता येतो. रेल्वेच्या माध्यमातून दिवसभरात हजारो टन माल पार्सलच्या माध्यमातून देशभरात पोहोचवला जातो. मनमाड रेल्वेस्थानक पार्सल सुविधा देण्यासाठीदेखील अग्रभागी असून, सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात मनमाड रेल्वेस्थानकावरून तब्बल चार लाख 48 हजार 519 पार्सलद्वारे 93 हजार 300 क्विंटलपेक्षा जास्त माल इतर राज्यांत पाठवण्यात आला.
यात मुख्यतः कांदा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, अद्रक, सिमला मिरची कोथिंबीर यांसह मिक्स व्हेजिटेबल मोठ्या प्रमाणात पार्सल करण्यात आले. नियमित गाड्या तसेच स्पेशल व्हीपी कोचद्वारे हा माल इतर राज्यांत पाठवण्यात आला. या सर्व पार्सलच्या माध्यमातून मनमाड रेल्वे स्थानकाकडून रेल्वेला तब्बल 3 कोटी 80 लाख 41 हजार 205 रुपये इतका नफा झाला. या कामाचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कौतुक केले. भविष्यात आणखीन मोठ्या प्रमाणात मनमाड स्थानकातून पार्सलद्वारे माल पाठवून आर्थिक उत्पन्न वाढेल, अशी आशा व्यक्त केली. मनमाड शहरातील तसेच आजूबाजूला असणार्या इतर जिल्ह्यांतील मालदेखील मनमाड रेल्वे स्थानकावरून इतर राज्यांत पार्सल व व्हीपी कोचद्वारे पाठवण्यात आला. यामध्ये देवळाली ते दाणापूर किसान रेलगाडीचादेखील महत्त्वाचा वाटा आहे. किसान रेलच्या माध्यमातूनही शेतकर्यांसह व्यापारी बांधवांनी आपला माल इतर राज्यांत पाठवला आहे.
मंडल प्रबंधक इती पांडेंचा सिंहाचा वाटा
भुसावळ डिव्हिजनच्या मंडल रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांच्या संकल्पनेने 01153 देवळाली-दाणापूर ही पॅसेंजर व पार्सल मिक्स किसान समृद्धी स्पेशल ट्रेन ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्यात आली व त्या ट्रेनद्वारे आतापर्यंत हजारो टन शेतमाल परराज्यात पाठवण्यात आला. त्यामुळे शेतकरी व व्यापार्यांंचा मोठा फायदा झाला. मनमाड स्थानकातून आतापर्यंत 1750 टन नाशवंत माल रेल्वेने पाठवण्यात आला. दर शनिवारी ही गाडी रात्री 11 ला मनमाड स्थानकातून सुटते. या गाडीचा फायदा शेतकरी, व्यापार्यांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.