नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर
नाशिक : प्रतिनिधी
शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून जून महिन्यापासून सुरू आहे. प्रशासनाने प्रभागरचनेसह इतर कामे करण्याकरिता मनपातील निवडणूक शाखेत पाच कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या चारशेने वाढणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येमुळे प्रशासनाकडून मतदान केंद्रे वाढवली जाणार आहेत. दरम्यान, नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला आहे.
2017 च्या निवडणुकीत एका प्रभागासाठी सरासरी चाळीस हजार मतदारांचा प्रभाग असे चित्र होते. परंतु, गत सात वर्षांत मतदारसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. 2019 व 2024 या दोन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्याने मतदारसंख्या थेट पावणेचौदा लाखांपर्यंत गेली आहे. परिणामी, महापालिकेच्या एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या थेट पंचावन्न हजारांच्या पुढे जाणार आहे. यामुळे मात्र उमेदवारांचा निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे. दरम्यान, शहराच्या व्याप्तीनुसार मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मनपाला सुमारे 1800 मतदान केंद्रांची आवश्यकता भासू शकते. गत निवडणुकीसाठी शहरात 1407 मतदान केंद्रे होती, त्यात आणखी चारशे केंद्रांची भर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणूक शाखेने जिल्हा निवडणूक शाखेकडे अद्ययावत मतदार यादीची मागणी केली आहे. याच मतदार यादीनुसार मतदार केंद्रांची निश्चिती केली जाणार आहे. मात्र, तूर्तास मनपा प्रशासनाने वाढती लोकसंख्या व त्यानुसार वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेता कच्चा आराखडा तयार केला आहे.
आयोगाला प्रभागरचनेचा आराखडा सादर
जून महिन्यापासून महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाला प्रभागरचनेचा आराखडा सादर केल्यानंतर नगरविकासने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी प्रस्ताव देण्यात आला आहे. यानंतर आयोगाकडून सदर प्रभागरचनेचा अभ्यास करून 22 ऑगस्टला प्रभागरचनेची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.