चासला उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे चार बछडे

तीन बछड्यांना उपचारासाठी नाशिकला हलवले

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील चास गावाच्या शिवारात ऊसतोडणी सुरू असताना कामगारांना बिबट्याचे चार बछडे आढळून आले. यापैकी एक बछडा मृतावस्थेत होता. अवघ्या 20 ते 25 दिवसांचे वय असलेल्या तीन बछड्यांना नाशिक येथील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. बुधवारी (दि.5) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हे बछडे आढळले.
चास येथील दगडू निवृत्ती खैरनार यांच्या शेती गट नंबर 97 मध्ये ऊसतोडणीचे काम सुरू असताना कामगारांना हे बछडे आढळले. उपासमारीमुळे एका बछड्याचा मृत्यू झाला होता, तर तीन बछड्यांची प्रकृती काहीशी नाजूक होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर वन मंडळ अधिकारी महेश वाघ, वनरक्षक आकाश रूपवते, वन्यजीव बचाव पथकाचे रोहित लोणारे, निखिल वैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नांदूर शिंगोटे येथील पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. अजय थोरात यांनी तपासणीनंतर तीन बछड्यांची नाशिकच्या म्हसरूळ येथील वन्यजीव रुग्णालयात रवानगी केली.

सावधानता बाळगण्याचे आवाहन

चास परिसरात बिबट्यांची संख्या वाढती असून, एकाच वेळी शेतामध्ये चार नवजात बछडे आढळल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. या बछड्यांच्या शोधात मादी परिसरात येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. बछड्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना त्यांच्या आईच्या सान्निध्यात सोडण्यासाठी नियोजन केले जाईल, असे वनाधकार्‍यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *