नाशिक : प्रतिनिधी
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची सुमारे तीनशे सदस्यांची पंढरपूरची वारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली. येथे संपूर्ण राज्यातून आलेल्या सायकलिस्टने विठूनामाच्या गजरात सर्व सायकलिस्टचा गोल रिंगण सोहळा पार पडला.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी सायकलवारीचे आयोजन करण्यात येते. यंदाची ही तेरावी वारी होती. अहिल्यानगर येथे पहिला मुक्काम करून शनिवारी सायंकाळी पंढरपूर येथे सायकलिस्ट सुखरूप पोहोचले. रविवारी संपूर्ण राज्यातील 91 क्लबचे 4 हजार सायकलिस्ट पंढरपूर येथे जमले. सकाळी विठ्ठल मंदिराला सायकलवर नगर प्रदक्षिणा घालून सर्व सायकलिस्टचा ताफा रेल्वे ग्राउंडवर रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झाला.
गेल्या तीन वर्षांपूर्वी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने अखंड महाराष्ट्रातील सायकलिस्टला पंढरपूर येथे एकाच दिवशी एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला. आज चार हजार सायकल वारकर्यांचा नेत्रदीपक रिंगण सोहळा बघून डोळ्याचे पारणे फिटले. लातूर सायकलिस्ट क्लबने स्वयंस्फूर्तीने यावर्षीचे यजमानपत्र स्वीकारले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मनीषा रौंदळ, दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पंढरपूर सायकलवारी प्रॅक्टिस राइड चॅलेंजचे मेडल वितरण पंढरपूर संमेलनात करण्यात आले. यासाठी चंद्रकांत नाईक यांनी आणि रवींद्र दुसाने यांनी मेहनत घेतली. सायकलवारीत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी हे पण सहभागी झाले होते. किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, सचिव संजय पवार, दीपक भोसले, पंकजकुमार पाटील, सुरेश डोंगरे व नितीन कोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वारीप्रमुख संजय बारकुंड, माधुरी गडाख, प्रवीण कोकाटे, बजरंग कहाटे यांनी मेहनत घेतली.