फेसबुकवर मैत्री मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर
फेसबुक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाडी विक्रीचा प्रयत्न
शहापूर: साजिद शेख
सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेऊन फसवणुकीच्या माध्यमातून गाडी विकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात पप्पु दामोर आणि सलीम शेख या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेली फेसबूकवर मैत्री आणि त्याच मैत्रीतून वापरण्यास दिलेली गाडी थेट विक्रीसाठी समाजमाध्यमावर काढल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी यांच्या मालकीची रेनॉल्ड द्विबर कंपनीची काळ्या रंगाची गाडी दिनांक २६ जुलै २०२५ रोजी फेसबुकवर ओळख झालेल्या पप्पु दामोर (रा. धारावी) याने चालविण्यासाठी मागवली. त्याने आपल्या चालक सलीम शेख यास फिर्यादीकडे पाठविले. सलीम शेख याने बॉबी राजु कुंचीकोरवे नावाचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड दाखवून, तोच फेसबुकवरील पप्पु दामोर असल्याचे सांगितले.
तक्रारीनुसार, पप्पु दामोर आणि सलीम शेख यांनी संगनमत करून गाडी अप्रामाणिक पद्धतीने आपल्या ताब्यात घेतली. मात्र त्यानंतर २६ ते ३१ जुलै या कालावधीत फिर्यादीस गाडी परत न देता, त्यांच्या संमतीविना ओएलएक्सवर गाडी विक्रीसाठी जाहिरात टाकण्यात आली. या प्रकारामुळे फिर्यादीची फसवणूक झाल्याचे कळाले. त्यानंतर फिर्यादींनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीवर विश्वास ठेवून वाहन किंवा अन्य मौल्यवान वस्तू सुपूर्द करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यापूर्वीही असे अनेक प्रकार समोर आले होते. नागरिकांनी समाज माध्यमावर कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासन सातत्याने करत असते. मात्र नागरिक त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारात नागरिकांनी तातडीने पुढे येऊन तक्रार देण्याची गरज आहे. फसवणुकीचे पुढचे प्रकार थांबवण्यासाठी याबाबत जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त होते आहे.