स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज्यातील सत्ताधारी पक्षाचा किंवा युती/आघाडीचा प्रभाव असतो. गेल्या महिन्यात झालेल्या नगरपरिषदा निवडणुकांत तेच दिसून आले होते. महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांना नगरपरिषदांत मतदारांनी तुटक-तुटक पसंती दिली. एकंदरीत महायुतीचा वरचष्मा दिसला. त्याचीच पुनरावृत्ती महापालिकांच्या निवडणुकांत झाली आहे. काही अपवाद वगळता संपूर्ण राज्यात भाजपाचा प्रभाव दिसला. पूर्वी गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस, असे चित्र पाहायला मिळत होते. आता काँग्रेसची जागा भाजपाने घेतली असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचाच बोलबाला दिसत आहे. या निवडणुकांत अनेक ठिकाणी महायुती तुटली होती; परंतु वेगवेगळ्या महानगरपालिकांत सत्तेसाठी महायुतीतील घटक पक्ष पुन्हा एकत्र येतील. तसे एकत्र येणे त्यांना भाग आहे. मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणूस, मराठी भाषा आणि मुंबईची अस्मिता उभी करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युती करून मराठी माणसांना भावनिक आवाहन करून भाजपासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण ठाकरे बंधूंना मुंबईत अपेक्षित यश मिळू शकले नाही. दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या भाजपाला रोखणे सोपे नाही, हेच विरोधकांनी लक्षात घ्यावे, असा संदेश निकालांतून दिला गेला आहे. भाजपाशी लढण्यासाठी विरोधी पक्षांनी मतभेद विसरून सयलोकांसमोर कार्यक्रम ठेवला पाहिजे, असाही संदेश मतदारांनी दिला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीला फटका बसला आहे. मराठी माणसाच्या मुंबईत भाजपा व शिवसेना शिंदे गटाने महायुती करून अजित पवार यांना बाजूला सारले होते. मराठी माणसांच्या बळावर ठाकरे बंधू युतीने मुंबईत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची संधी दिली आहे. ठाकरे बंधूंना मुंबईत वॉच डॉगची भूमिका बजावावी लागणार आहे. ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्याने मुंबईतील परप्रांतीय मतदार धास्तावून डोळे झाकून भाजपाकडे गेला, असे दिसते. इतकेच नव्हे, तर मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नावाखाली व्यवस्थितपणे केले. एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे आणि भाजपाचा मुकाबला करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती केली. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाची मुंबई या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंनी भावनांना हात घातला. मराठी माणसं आपल्या मागे येतील, हाच त्यांचा विश्वास होता; परंतु त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीकडे दुर्लक्ष केले. ठाकरे बंधूंच्या युतीने परप्रांतीय धास्तावले असावेत. त्यांनी सुरक्षित मार्ग म्हणून भाजपाचे ’कमळ’ हाती घेतले. केवळ मोठ्या सभा घेऊन प्रचार करण्यावर ठाकरे बंधूंनी भर देऊन भावनिक आवाहन केले. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपाने आपली रणनीती बदलली. मराठी मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांचा कुशलतेने वापर केला. भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांना विरोध करताना मुंबईचा महापौर हिंदू होईल, असे जाहीर करत हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करतानाच मराठी हिंदूंनाही आपलेसे केले. याशिवाय परप्रांतीयांना जवळ केले. गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतदार भाजपाकडे जाणारे आहेत. या मतदारांना आपलेसे करण्यात काँग्रेसलाही यश आले नाही. ठाकरे बंधूंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले. पण मुंबईत चांगली ताकद असलेल्या काँग्रेसने राज ठाकरे यांच्या परप्रांतीय भूमिकेला विरोध करून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाकडे असलेली परप्रांतीय मते खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले नाही. याचा आपसूक फायदा भाजपाला आणि शिंदेंच्या शिवसेनेला झाला. मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांकडे राज्याचे विशेष लक्ष होते. दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतून बाहेर पडून भाजपाला आव्हान दिले. भाजपाशी दोन हात करण्यासाठी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. प्रचाराची सूत्रे अजित पवार यांच्याकडेच होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर आरोप करताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. पण 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा यानिमित्ताने पुन्हा समोर आला. काका-पुतणे स्थानिक सत्तेसाठी एकत्र आल्याचे मतदारांच्या लक्षात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या ताकदीचा अंदाज पवार युतीला आला नाही. भाजपाची रणनीती कोणाच्याही लवकर लक्षात येत नाही. ती पवार युतीच्याही लक्षात आली नाही. ठाकरे युती निष्प्रभ ठरत असताना पुण्यात पवार युती निस्तेज झाली. भाजपाबरोबर साथसंगत केल्याने काय होते, याचा अनुभव उद्धव ठाकरे यांनी 2014 सालीच घेतला होता. आता तोच अनुभव अजित पवार यांनी थोडासा घेतला आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी आपापल्या ताकदीवर लढले खरे, पण सत्तेसाठी तिन्ही पक्ष बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एकत्र येतीलच. या निवडणूक निकालांनी काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाचा स्थानिक पातळीवर मुकाबला करणे सोपे नाही, हे विरोधकांच्या लक्षात आले. कितीही मोठमोठ्या सभा घेऊन कितीही आगपाखड केली, तरी काही उपयोग होत नाही, हे ठाकरे बंधूंच्या लक्षात आले असेल. आता त्यांना आत्मपरीक्षण करून नवीन रणनीती आखावी लागेल. पवारांच्या बाबतीतही तेच. यापुढे एकत्र यायचे का नाही? याचा विचार पवार काका-पुतण्यांना करावा लागेल. भाजपाचा हात सोडला, तर फायदा नव्हे, तर नुकसान होते, हे अजित पवार यांच्या लक्षात आले असेलच. आता त्यांनाही आत्मपरीक्षण करावे लागेल. ठाण्यातही एकनाथ शिंदे यांना तोच विचार करावा लागेल. मुंबईत भाजपाचा हात धरूनही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश आले नाही. मुंबई असो की पुणे, सत्ताधार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मतदारांनी प्रबळ विरोधी पक्ष निवडले आहेत. ठाकरे असो की पवार, पण ते एकत्र आले ते केवळ सत्तेसाठी, हे लोकांच्या सहज लक्षात आले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांत एकनाथ शिंदे यांनी महायुती तोडून आपले वर्चस्व राखले. या ठिकाणीही ठाकरे बंधूंची जादू चालली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व असलेली नागपूर महानगरपालिका अपेक्षेप्रमाणे भाजपाने राखली. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पवार युतीला वर्चस्व राखता आले नाही. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांत एकनाथ शिंदे यांनी आपली शान राखली. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर राखले. पण अजितदादांना पुण्यात भाजपासमोर गुडघे टेकवावे लागले. बहुतांश महानगरपालिकांत महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे पक्ष स्थानिक परिस्थिती पाहून एकत्र येतील. लातूर, भिवंडी, मालेगाव, वसई-विरार अशा मोजक्या महापालिकांत यश मिळण्याची अपेक्षा भाजपाची नव्हती; परंतु बहुतांश महापालिकांत भाजपाने पहिले स्थान मिळविले. भाजपाला लोकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वीकारले, असा एक संदेश या निवडणुकांतून दिला गेला आहे. भाजपाविरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्षांनी अगदी ठाकरे बंधूंनी नवीन रणनीती आखली पाहिजे. केवळ भाजपावर टीका करून चालणार नाही, तर भाजपाच्या रणनीतीचा अभ्यास करून नवीन रणनीती आखावी लागेल. पण विरोधक मतभेद विसरून एकत्र आले तर ठीक. नाहीतर एक नाही धड भाराभर चिंध्या…
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…