‘लाडकी बहीण’वरून फडणवीस यांचे स्पष्टीकरण
पुणे :
विधानसभा निवडणकीत महायुती सरकारच्या विजयाचा मोठा वाटा उचलणार्या लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेसाठी दुसर्या विभागाचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप मंत्र्यांनंतर विरोधकांनी केला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून, अशा प्रकारे निधी वळविण्यात आलेला नाही. विरोधकांनी विनाकारण आरोप करू नये, असे फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असेही म्हटले होते. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी कल्याण विभागाचे 335 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे.
आपल्या अर्थसंकल्पाच्या नियमांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूद ही त्या हेड खालीच करावी लागते. म्हणूनच अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि भाषणात सांगितले की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जेव्हा दुसर्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसर्या कामावर खर्च केला जातो, तेव्हा आपण निधी वळवला असे म्हणतो. अर्थसंकल्पामध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणे चूक नाही. पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणे हा अर्थसंकल्पाचा नियम आहे. त्याचप्रमाणे ते अर्थसंकल्पामध्ये दाखवलेले आहे आणि त्यातून तो खर्च केलेला आहे. फडणवीस पुढे म्हणाले, एखाद्या विभागासाठी राखून ठेवलेला निधी जर दुसर्या विभागात वापरला गेला, तरच त्याला ’निधी वळवला’ असे म्हणता येईल. मात्र, येथे तशी परिस्थिती नाही. जे पैसे त्या घटकासाठी खर्च व्हायचे आहेत, तेच त्यांच्या नावाने अर्थसंकल्पात दाखवले गेले आहेत. त्यामुळे कुठल्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही.सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील निधी वळवण्याच्या आरोपांवर काही प्रमाणात पडदा टाकला गेला असला, तरी विरोधक या मुद्द्यावर किती पुढे आक्रमक भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धूल चेहरे पर थी
और आईना पोछते रहे!
ता उम्र राहुल जी आप यह गलती कर बैठे, धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे! अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 2024 मध्ये लोकशाहीला हानी पोहचविण्याची एक सुनियोजित योजना असल्याच्या गांधी यांच्या आरोपावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
औंध येथील महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील निवडणुकीबाबत फॅट्स आणि फिगर दिले गेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणं सोडतील.मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत, राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी, लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात. महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा सेवक म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा नेहमीच निषेध करेन, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.