कांद्यापासून साकारली गणेश मूर्ती

लासलगाव:  समीर पठाण

नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी कांद्यापासून गणेश मूर्ती तयार करून या गणेश मूर्तीची स्थापना केली व राज्यातील राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी गणरायांच्या चरणी प्रार्थना करून राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे साकडे या वेळी गणरायाला घातले.

महाराष्ट्रात अनेक समस्या असून सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांची आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.कोरडा दुष्काळ,ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे.शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संजय साठे यांनी कांद्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.सध्या कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात जात आहे.गेल्या चार पाच वर्षापासून कोरोनाच्या काळात फार मोठा तोटा झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे.त्यामुळे मुला मुलींचे लग्न,मुलांचे शिक्षण,घरातील वृध्द आई वडीलाचे आजार इतर खर्च करणे दुरापास्त झाले आहे

दिवसेंदिवस महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या वाढत आहे त्या बंद होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे.कांदा पिकासाठी कायमस्वरूपी आयात,निर्यात धोरण ठरवून त्यानुसार निर्यात,आयात करून शेतकऱ्यांना व देशातील ग्राहकांना योग्य दरात अन्नधान्य मिळावे ह्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे अशी भावना कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी दैनिक गावकरीशी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *