ग्रँड ओल्ड पार्टी म्हणजेच सर्वांत जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अखेर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद होते. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधील काही नेत्यांनी (जी-२३) सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा आणि संघटनात्मक निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार उशिरा का होईना अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्षपदासाठी मतदान पार पडले. निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मतमोजणी मल्लिकार्जुन खरगे यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांनी शशी थरूर यांचा पराभव केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अनेकदा नाट्यमय वळण लाभले. अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केरळमधील खासदार शशी थरूर आणि कर्नाटकातील मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नावे चर्चेत होती. अशोक गेहलोत यांचे नाव सर्वांत पुढे होते. सोनिया आणि राहुल गांधी यांची गेहलोत यांच्या नावाला पसंतीही मिळाली होती. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही केली होती. परंतु, राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडून सचिन पायलट यांच्याकडे राज्याची कमान देण्यास त्यांनी नकार दिला. शिवाय आपल्या समर्थक आमदारांना राजीनामे देण्यास सांगून सोनिया आणि राहुल गांधी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला आणि त्यांचा पत्ता कापला गेला. दुसरीकडे, शशी थरूर यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर केला. त्यांची तयारी झाली असतानाच दिग्विजय सिंह यांनीही निवडणुकीत उडी घेण्याची घोषणा केली. परंतु, नंतर त्यांनी माघार घेतली. पक्षाचे अध्यक्ष व्हावे म्हणून राहुल गांधींना गांधीनिष्ठ नेत्यांनी गळ घातली होती. महाराष्ट्रासह सात-आठ प्रदेश काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांना बिनविरोध अध्यक्ष करण्याचा ठरावही मंजूर केला होता. परंतु, अध्यक्ष व्हायचे नाही, या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका राहुल गांधी यांनी कायम ठेवली. त्याचमुळे अध्यक्षपदाची निवडणूक अटळ ठरली.
राहुल, सोनियांची भूमिका
काँग्रेसला तब्बल दोन तपांनंतर, म्हणजेच २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. याआधी सीताराम केसरी हे १९९६ ते १९९८ या काळात अध्यक्ष होते. सन १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यास नकार दिला होता. त्यावेळी राहुल आणि प्रियंका गांधी लहानच होते. अशा परिस्थितीत पी. व्ही. नरसिंह राव यांनी अध्यक्षपदाबरोबरच देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली होती. पी. व्ही. नरसिंह राव यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी केसरी यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभव पत्करला होता. केसरी यांच्यानंतर शरद पवारांसह ज्येष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन सोनिया गांधी यांनी १९९८ साली सक्रिय राजकारणात येऊन पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. सोनिया गांधी यांच्यात कारकिर्दीत राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आले आणि नंतर ते पक्षाध्यक्ष झाले. सन २०१९ साली राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा झाल्या. परिवारवाद आणि घराणेशाहीचा मुद्दा प्रचारात वापरुन नेहरु-गांधी घराण्याला भारतीय जनता पार्टीने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत लक्ष्य करत असल्यानेच सोनिया, राहुल आणि प्रियंका यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला. राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे कार्यकारी समिती सदस्य वगळता कोणतेही पद नव्हते. तरीही पक्षाच्या धोरणात्मक निर्णय प्रकियेत त्यांचा सहभाग असायचा किंवा तेच काही निर्णय घेत असायचे. अर्थात, भाजपा, संघ परिवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात राहुल गांधी हेच सतत पुढे राहिले आणि आहेत. ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात त्यांचाच पुढाकार असून, तेच या यात्रेचे नेतृत्व करताना सरकार आणि भाजपावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर खरगे अध्यक्ष झाले असले, तरी गांधी घराण्याची पक्षावर पक्कड राहणारच आहे. याचे कारण गांधी घराण्याच्या भक्कम पाठिंब्याने खरगे अध्यक्ष झाले आहेत. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते समजले जातात. भविष्यात पक्षात मिळणाऱ्या नव्या जबाबदारीवर राहुल गांधी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खरगेजींना विचारा, असे उत्तर दिले. तेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागलेला नव्हता. यावरुन गांधी घराण्याचा खरगे यांनाच पाठिंबा असल्याचे सिध्द होत आहे. अध्यक्ष म्हणून पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार खरगे यांना प्राप्त झाले असले, तरी गांधीनिष्ठ या नात्याने ते सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी सल्लामसलत करुन निर्णय घेतील. यामुळे गांधी घराण्याचे महत्व कमी होणार नाही, हे तितकेच सत्य.
भाजपाचे आव्हान
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी असल्याने काँग्रेसला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व असून, अध्यक्षांना तितकाच मानही असतो. ही बाब लक्षात घेता खरगे यांना मोठा सन्मान मिळाला आहे. त्याचबरोबर भाजपाकडून काँग्रेसवर घराणेशाहीच्या केल्या जाणार्या आरोपाला गांधी घराण्याने एक उत्तरही दिले आहे. खरगे स्वतंत्रपणे काम पाहतील, अशी अपेक्षा आहेच. परंतु, त्यांच्यासमोर पक्षात जिवंतपणा आणण्याचे एक आव्हान आहे. भाजपाचा सामना करण्यापेक्षा पक्षातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे. जी-२३ नेत्यांनीही खरगे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. जी-२३ मधून काही नेते पक्षाबाहेर पडले असले, तरी जे आहेत, त्यांनी खरगे यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. पक्ष चालविणे हे टीमवर्क (सांघिक कार्य) असल्याचे खरगे यांनी निकालापूर्वीच म्हटले होते. पक्षाध्यक्ष या नात्याने त्यांनी एक चांगली टीम तयार करुन जबाबदारीचे वाटप केले, तर भाजपाचा सामना करता येऊ शकेल. खरगे यांच्या हाताखाली काम करण्याची आणि ते देतील ती जबाबदारी निभावण्याची तयारी राहुल गांधी यांनी दर्शवली आहे. पराभूत झालेल्या शशी थरूर यांनी खरगे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनणे ही एक मोठी सन्मानाची बाब आहे. त्यासोबतच ती एक मोठी जबाबदारीही आहे, असे नमूद करत शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. खरगे यांना यश मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. खरगे यांच्यासमोर त्यांच्याच कर्नाटक राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीचे पहिले आव्हान आहे. त्यानंतर खरे आव्हान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे. भाजपाला आतापासून उघडे पाडण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढली आहे. म्हणूनच खरगेंना सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांना बरोबर घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. भाजपाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्याने चालत असतील, तर खरगे यांनी गांधी घराण्याचा सल्ला घेण्यात वावगे काहीच नाही.