तब्बल 16 तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक

नाशिक : प्रतिनिधी
यंदाही शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीने आपले वेगळेपण जपत ढोल-ताशांच्या गजरात आणि संततधारेतही भाविकांच्या सहभागातून लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप दिला. शनिवारी (दि. 6) सकाळपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक पहाटे चारला संपली. सुमारे 16 तास अखंड ही मिरवणूक चालली.
जुन्या नाशिकमधील वाकडी बारव येथून परंपरेनुसार मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनीही ढोल वाजवत मिरवणुकीत परंपरेचा आनंद घेतला. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हेही उत्साहात सहभागी झाले. त्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, गणेश मैड, प्रशांत पगार, रवींद्र बागूल, रवी पाटील, दीपक मालवाल, समीर रकेट, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद या सर्वांनी उत्साहाने नृत्याचा ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला.

मानाचे गणपती क्रमवारीनुसार मार्गस्थ

1. महापालिकेचा मानाचा गणपती.
2. रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती.
3. गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळ.
4. साक्षी गणेश.
5. श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ.
यानंतर शहराचा महागणपती शिवसेवा मित्रमंडळाचा ‘नाशिकचा राजा’, दंडे हनुमान मित्रमंडळ, युवक मित्रमंडळ मुंबई नाका, युनायटेड फ्रेंड्स सर्कलसह एकूण 25 मंडळांचे चित्ररथ होते.

मिरवणुकीवर 83 सीसीटीव्हींची नजर

विविध मार्गांंवर वाहतूक नियोजनासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. प्रथमच एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेर्‍यांचा वापर करण्यात आला. महापालिका प्रशासनाने नदी किनार्‍याच्या परिसरात जीवरक्षक पथके तैनात केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *