वरुणराजाच्या साक्षीने गणेश विसर्जनाचा महासोहळा
सिडको : विशेष प्रतिनिधी
पावसाच्या सरींनी सगळी नगरी चिंब भिजवलेली… आकाशातून वरुणराजा जलाभिषेक करत होता आणि जमिनीवर, भक्तीच्या लाटा उसळत होत्या. अशा वातावरणात नाशिककरांनी गणेश विसर्जनाचा दिवस एक भक्तिपर्व म्हणून अनुभवला. गणेश विसर्जनाच्या या सोहळ्याने संपूर्ण शहर भारून टाकले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गर्जनांनी आकाशाचा काठही थरथरून गेला. पारंपरिक वाद्याच्या आणि ढोल- ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यंदा प्रथमच विसर्जन मिरवणुकीत 24 हून अधिक गणेश मंडळे सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे पार मिरवणुका पार पडल्या. पोलीस प्रशासनासह प्रशासनाने गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह नाशिककर गणेशभक्तांचे आभार मानले.
यावर्षी महापालिकचा मानाचा गणपतीचा चित्ररथ मिरवणुकीच्या प्रारंभी एक नंबरला होता. त्यापाठोपाठ रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळा सोमवार पेठ, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ साक्षी गणेश, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठरोड पंचवटी, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी नाशिक, श्रीगणेश मूकबधिर मित्रमंडळ नाशिक, रोकडोबा मित्रमंडळ, नावदरवाजा नाशिक, शिवसेवा मित्रमंडळ, गा. म. पुतळा नाशिक शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), अशोक विद्यार्थी मित्रमंडळ, मुंबई नाका, दंडे हनुमान मित्रमंडळ, काजीपुरा चौक नाशिक, युनायटेड फॅण्ड सर्कल, मुंबई नाका संदीप हॉटेलसमोर, श्री शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ, पिंपळपार नाशिक, वेलकम सहकार्य मित्रमंडळ नेहरू चौक, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, बुरूड गल्ली लोकप्रिय मित्रमंडळ, भोई मित्रमंडळ भोई गल्ली, कथडा, नवक्रांती मित्रमंडळ, काठे गल्ली, अंबिका मित्रमंडळ, पंचवटी, श्री तीळभांडेश्वर मित्रमंडळ, सराफ बाजार आदी गणेश मंडळे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती.
यावर्षी मानाचा महापालिकेच्या पहिल्या गणपतीचे सायंकाळी सात वाजता विसर्जन करण्यात आले, तर शेवटच्या गणपतीचे रात्री तीन वाजेच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे एक खास आकर्षण ठरलं ते म्हणजे, महिलांचे शंखनाथ पथक, तसेच गुलालवाडी व्यायामशाळेचे लेझीम पथक. यांसह शिवसेवा युवक मित्रमंडळाने सादर केलेला ’स्त्रीशक्तीचा जागर’. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून उभा केलेला हा देखावा केवळ नयनरम्य नव्हता, तर अंतर्मुख करणारा होता. जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई यांच्या ऐतिहासिक प्रतिमा ते आजच्या काळातील यशस्वी महिलांचे सजीव दर्शन- हे दृश्य पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि डोळेही पाणावले. याच मिरवणुकीत एक वेगळ्याच कलात्मकतेची झलक पाहायला मिळाली- दंडे हनुमान मित्रमंडळाच्या रथासमोर थिरकणारा ‘पपेट’. ढोल-ताशांच्या लयीत नाचणारा हा कळसूत्री बाहुला इतका वास्तवदर्शी होता की क्षणभर त्याला मानव मानावं! कलाकाराच्या बोटांच्या हालचालींवर नाचणार्या या पपेटने उपस्थित तरुणाईला अक्षरशः भुरळ घातली. परंपरेला आधुनिकतेची लयबद्ध जोड देण्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. एकंदरीत नाशिकमधील या वर्षीचं गणेश विसर्जन हे केवळ धार्मिक विधी न राहता, तो एक सांघिक उत्सव, एक भावनिक सोहळा आणि एक सामाजिक जाणिवांचा
जागर ठरला.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…