चोरीच्या दहा दुचाकींसह टोळी जेरबंद

नाशिकरोड :गोरख काळे
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व मोटारसायकल चोरी प्रतिबंध पथकातील अंमलदार यांनी संयुक्त गोपनीय माहिती काढून दुचाकी गाड्या चोरणार्‍या टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून दहा मोटारसायकली व दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी परिमंडळ दोनमधील सर्व पोलीस स्टेशनमधून 10 पोलीस अंमलदार व एक अधिकारी यांची निवड करून पथक स्थापन केले. त्याचप्रमाणे नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोर्‍या होत आहेत. दुचाकी गाड्या चोरणार्‍याविरुद्ध पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मोटारसायकल चोरी प्रतिबंध विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली. संशयित आरोपी अजय प्रवीण दहेकर (वय 22 रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अमोल बाळू इंगळे (वय 23, रा. म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, अंबड) यांना विधी संघर्षित बालकासह कुकरीसारखे हत्यार जवळ बाळगताना पकडल्यानंतर या तपासात संशयित साथीदार विजय प्रल्हाद आव्हाड (वय 20, रा. गणेश चौक, सिडको) यास ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून दोन मोबाइल, आठ मोटारसायकली असा ऐकून दोन लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाप्रमाणे माहिती काढून आरोपी नीलेश बापू बेलदार (21 रा. देवळालीगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या, असेही ते म्हणाले. या सर्वांनी नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, मुंबई नाका, पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या चोरल्या होत्या. हे सर्व गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.
नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्वतः नाशिकरोड पोलीस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले. सदरची कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे, विष्णू गोसावी, अविनाश देवरे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे, विनोद लखन, शरद झोले, किरण गायकवाड, स्वप्निल जुन्द्रे, अजय देशमुख, अनंत महाले, तुकाराम जाधव, मुश्रीफ शेख यांनी ही कामगिरी केली. या सर्वांचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *