अ‍ॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

सिन्नर पोलिसांची धडक कारवाई; 10.77 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात अल्युमिनियमच्या तारा चोरणार्‍या टोळीला सिन्नर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 10 लाख 77 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
निफाड- सिन्नर मार्गावर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती पांढर्‍या रंगाच्या महिंद्रा पिकअप (एमएच 15 केएच 0098) वाहनातून संशयास्पद माल घेऊन सिन्नरकडे येत आहेत. त्यानुसार गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी समाधान बोराडे, नितीन डावखर, कोकाटे, काकड व सहाणे यांना तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
संगमनेर नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी करून संबंधित वाहन थांबवले. वाहनातील चालकाने आपले नाव मकसूद कल्लू शेख (वय 32), तर त्याचे साथीदार आसिफ जुम्मन शेख (19) व फहीम अहमद अन्सारी (38) असल्याचे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता पिकअपमध्ये अल्युमिनियम तारांचे बंडल आढळून आले.
याबाबत आरोपींकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांना वाहनासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढील तपासात संशयित मकसूद कल्लू शेख व फहीम अहमद अन्सारी यांनी सुमारे आठ ते दहा महिन्यांपूर्वी पास्ते शिवारातील अल्युमिनियम तारांची चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी यापूर्वीच सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कारवाईत पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कोकाटे, काकड, सहाणे तसेच सिन्नर गुन्हेशोध पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर गुन्हेशोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार सुहास गोसावी व समाधान बोराडे करीत आहेत.

Gang of aluminum wire thieves arrested

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *