45 लाखांच्या 52 मोटारसायकल हस्तगत
नाशिकरोड ः विशेष प्रतिनिधी
शहरातून मोटारसायकल चोरून त्या वाहनाचे बनावट आरसी बुक व नंबर प्लेट तयार करून विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिकरोड पोलिसांना मोठे यश आले आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 45 लाख रुपये किमतीच्या चोरीतील 52 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळ व पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश दीपक डावरे (वय 30, रा. पुष्पक अपा, मंगलमूर्तीनगर, जेलरोड, नाशिकरोड), जावेद इस्माईल शेख (24, रा. न्यू स्टेशनवाडी, चंद्रमणीनगर, देवळाली कॅम्प), मुस्तफा मोहम्मद शेख (वय 22, रा. सात आळी, बुचडी ग्राउंडजवळ, देवळाली कॅम्प) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, नाशिकरोड न्यायालयाबाहेरील पार्किंगमधून लतिफ गुलाब शेख यांची हीरो होंडा कंपनीची स्पेलन्डर मोटारसायकल (एमएच15- 2667) 1 जानेवारीला चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेशोध पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना 20 ते 30 वयोगटाचे तीन संशयित हे आंतरजिल्ह्यात वारंवार मोटारसायकल चोरी करून, तसेच खोटे आरसी बुक व खोटी नंबर प्लेट बनवून चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करतात. ते खरेदी करणार्या व्यक्तीस बनावट कागदपत्रे दाखवितात. हे संशयित 8 जानेवारीला सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बसडेपो येथे चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याकरिता व्यवहारासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः तसेच गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी दोन पंचांसह सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो येथे सापळा रचला. तिथे तीन संशयित आल्यानंतर त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक स्प्लेंडर व एक बुलेट होती. खिशात बनावट चार आरसी बुकदेखील मिळाले. त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या स्पेंडर मोटारसायकल व बुलेटवरील नंबर प्लेटची पडताळणी करता त्या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात तिघांची सखोल चौकशी केली असता, आरोपींकडून नाशिक आयुक्तालयातील व जिल्ह्याबाहेरील एकूण अंदाजे 45 लाख रुपये किमतीच्या 52 मोटारसायकल हस्तगत केल्या. चोरी केलेल्या या मोटारसायकल आरोपींंनी निर्जन ठिकाणी डम्प करून ठेवल्या होत्या. खोटे आरसी बुक व कागदपत्रे व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करण्याची त्यांची पद्धत होती. आरोपींनी कटकारस्थान करून चोरीच्या मोटारसायकलची खोटी कागदपत्र तयार करून ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून वरिष्ठ निरीक्षक सपकाळे यांनी उत्कृष्ट पोलिसिंग केल्याचे नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड पोलीस स्वतःशीच स्पर्धा करताना एकापेक्षा एक असे डिटेक्शन करत असल्याचे सांगितले. ’नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला…’ ही संकल्पना सर्वप्रथम सपकाळे यांनी राबवली. नंतर ती संपूर्ण शहरात अंमलात आल्याचे आवर्जून नमूद केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त संगीता निकम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Gang selling stolen vehicles through fake RC books busted