आए,मला बी गारीगार

लेखिका..सविता एरंडे

समीर जवळपास पंधरा दिवसांनी कंपनीचं काम करून घरी आला. घर पाहिल्यावर पंधरा दिवसांचा प्रवासाचा अर्धा थकवा नाहीसा झाला. घरी आल्यावर आता मस्त दिवसभर लोळत पडायचं, छान गाणी ऐकायची असा विचार चालू होता. तेवढ्यात
बाबाम्हणत त्याची पाच वर्षाची लाडकी माऊ त्याला बिलगली.

पंधरा दिवसांनी तिचा बाबा तिला भेटत होता. माऊनं मारलेल्या घट्ट मिठीत तो स्वर्गसुख अनुभवत होता. त्या चिमुकल्या बालमिठीत तो  विसावला होता. हे सुख कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं. माऊच्या गोबर्‍या गोबर्‍या गालाची पापी घेत होता. माऊ त्याला म्हणत होती, बाबा,का बरं मला सोडून तू गावाला जातोस ?मला बिलकुल करमत नाही तू नसलास की !आता नाही ना जाणार ? नाही गं पिलू, आता नाही जाणार तुला सोडून. ओके? खरं ? अगदी खरं. बाबा आज आपण गाडीतून बर्फाचा गोळा खायला जायचं बरं का?
किती दिवसात आपण गाडीतनं बाहेर गेलो नाही. सांग ना बाबा, जायचं ना आज?तिचं लाडं लाडं बोलणं पंधरा दिवसांनंतर समीर ऐकत होता. हो गं पिलू, नक्की जाऊ या .  प्रॉमिस ?
हो गं, प्रॉमिस  येऽऽऽऽ  करत माऊ आनंदानं उड्या मारत घरात पळाली. समीरला प्रवासाचा खूपच शीण आला होता.आज त्याला आरामाची खूप आवश्यकता होती. समीराने.. त्याच्या पत्नीने..जेवायला व नाश्त्याला काय काय करायचं ते आधीच ठरवून ठेवलं होतं.समीरा पण नोकरी करत होती. या वीकेंडला समीरच्या व माऊच्या आवडीचे पदार्थ करायचे असं तिनं ठरवलं होतं. पंधरा दिवसांचा दौरा करून समीर आज घरी आलाय म्हणून ती पण मनोमन खूश
होती.

आज नाश्त्याला समीरानं साबुदाण्याची खिचडी केली होती. माऊला  व समीरला साबुदाण्याची खिचडी म्हणजे जीव की प्राण! साबुदाण्याची खिचडी पाहून माऊ  येऽऽ करून नाचायलाच लागली. समीरा
डिशमध्ये खिचडी वाढेपर्यंत माऊने कढईतील गरम
खिचडीचा घास तोंडात टाकला. जिभेला चटका
बसताच , आई , पाणी, पाणी म्हणून ओरडू लागली. अगं माऊ थांब.खिचडी जरा थंड होऊ दे.समीरा म्हणत होती. पण माऊ कुठली ऐकायला!तिला कधी एकदा पोटभर खिचडी खाते ,असंच झालं होतं. समीरानं पण पहिला घास खाताच , आहाहा!वा! मस्त.म्हणत यथेच्छ खिचडी खाल्ली.समीरानं
चहाचा कप समीर समोर
ठेवला व ती पण त्याच्या
शेजारी बसून नाश्ता करत पंधरा दिवसांचा गप्पांचा बॅक लॉग भरून काढू लागली.

दुपारचा मेनूही आज मस्त होता. स्वीट कॉर्न सूप, गाजर हलवा ही समीरच्या आवडीची स्पेशल डिश तर माऊच्या आवडीचा पनीर पराठा तिने आज बनवला होता. जेवता जेवता समीर
आपल्या पत्नीला म्हणाला समू, खरंच तुझ्या हातात जादू आहे जादू!आज सगळेच पदार्थ एकदम लाजवाब! समीर आज जरा नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवला. खूप दिवसांनी घरचं जेवण व घरट्यातली प्रेमळ ऊब तो अनुभवत होता. समीरचे डोळे जडावले. कधी एकदा गादीवर अंग टाकतो असं त्याला झालं. बेडरुममध्ये
येऊन त्यानं मस्तपैकी ताणून दिली.

चार वाजता माऊ बाबाला उठवायला आली. बाबा,ऊठ ना. आपल्याला बर्फाचा गोळा खायला जायचंय ना? माऊ त्याला हलवून जागं करत होती. समीरचे डोळे उघडत नव्हते,पण शेवटी नाईलाजास्तव तो उठला. फ्रेश झाला. समीरा, माऊ पण तयार झाल्या. समीरनं गाडी काढली व तिघेही बर्फाच्या गाडीच्या दिशेने निघाले. गाडीत माऊची अखंड बडबड चालू होती.

रस्त्याच्या एका कडेला बर्फ गोळ्याची गाडी दिसताच माऊ ओरडली ,बाबा, बाबा ती बघ बर्फ गोळ्याची गाडी. चल ना बाबा, मला खायचाय ना तो रंगीत रंगीत बर्फाचा गोळा.
माऊने हट्ट धरला. सकाळी मी तिला कबूल केलं होतं ना, तुला बर्फ गोळा खायला नेईन म्हणून….

अखेर बालहट्टच तो!
त्यापुढे समीरला शरण जावेच लागले.कारण सकाळीच माऊला समीरनं बर्फगोळा खाऊ घालण्याचं कबूल केलं होतं. समीरनं आपली गाडी बर्फगोळ्याच्या गाडीच्या दिशेने वळवली. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली.
माऊनं गाडीतून उडी मारली आणि ती धावतच बर्फाच्या गाडीजवळ गेली. तो बर्फाचा पांढराशुभ्र कीस, बाटलीतलं ते रंगीत रंगीत लाल,हिरवं ,गुलाबी पाणी पाहून माऊ आनंदानं उड्याच मारू लागली. बर्फवाल्याने माऊसाठी छान बर्फगोळा तयार केला. समीरा व समीर
देखील बर्फगोळ्याच्या प्रेमात पडले. तिघेही आपल्या गाडीत बसून
आहाहा! मस्त, मस्त
करत अगदी चवीचवीनं आस्वाद घेऊ लागले.
समीरनं तेवढ्यात सेल्फी पण काढला.

तिघेही तो रंगीत रंगीत गोळा खाण्यात मग्न झाले होते. तेवढ्यात एक फुगे विकणारी बाई तिच्या लहान मुलीसह गाडीजवळ आली. त्या छोट्या मुलीचं लक्ष
आम्ही खात असलेल्या बर्फाच्या गोळ्या कडे गेलं. ती आईचा हात ओढून म्हणाली , आये, मला बी गारीगार खायाचंय. चल की ! ती मुलगी अधाशीपणे
माऊकडे बघत होती.
ती फुगे विकणारी बाई
समीरकडे पाहून म्हणाली ,  साएब, फकिस्त योक फुगा
घ्या ना. फकिस्त दहा रुपय द्या. सकाळधरनं योक बी गिराईक न्हाय. योक बी फुगा इकला न्हाय. माज्या लेकीनं
कवाधरनं हट धरलाय. मला गारीगार खायाचं हाय म्हनून. तुमच्या बेबीला योक फुगा घ्या ना साएब.

समीरला तिची दया आली. माऊ पण म्हणाली  बाबा, दे ना रे तिला दहा रुपये.त्या छोट्या मुलीची आशाळभूत नजर पाहून
समीरने तिच्या कडून एक  फुगा विकत घेतला व दहा रुपये तिला दिले. ते दहा रुपये पाहताच ती छोटी मुलगी आईचा हात सोडून बर्फ वाल्याच्या गाडीकडे पळत सुटली. फुगेवाली बाई अगं , नकुशे थांब थांब जरा  असं म्हणत होती
तेवढ्यातच पोलिसांचा ताफा रस्त्यावरील विक्रेते उठवण्यासाठी आला. त्यांनी सर्व हातगाडी वाल्यांना हाकलायला सुरुवात केली. फुगेवालीचा आवाज त्या छोट्या मुली पर्यंत कुठला पोहोचायला? एकच गडबड गोंधळ सुरू झाला. त्या गरीब मायलेकींची ताटातूट
झाली. पोलिसांनी सगळ्या कार देखील भराभर पुढे सरकवण्या -साठी गडबड सुरू केली. समीरने पण आपली गाडी काढली.तो घरी आला,पण त्याला काही चैन पडेना. त्याच्या डोळ्यासमोर सारखी ती फुगे वाली बाई व माऊकडे आशाळभूत नजरेने पाहणारी तिची ती छोटी मुलगी दिसत होती. तो विचार करू लागला, ’कुठे गेली असेल ती छोटी मुलगी ? तिची व आईची भेट झाली असेल का ?
तिला ’गारीगार ’ खायला मिळालं असेल का ?’
तो विचारात बुडून गेला.

आपण सुखवस्तू घरातील माणसं!आपल्या
मुलांचे अवाजवी  हट्ट पुरवतो. त्यांच्या तोंडातून   शब्द निघण्याचा अवकाश की ती वस्तू त्यांच्या हातात हजर असते. त्यामुळं सुखवस्तू कुटुंबातील मुलांना मनावर  संयम ठेवणं , शेअरिंग करणं, मदत करणं हे माहित नसतं. फार ’ आत्मकेंद्री’  असतात ही आपली मुलं!

हे हलाखीत जीवन जगणारे लोक ! छोटे विक्रेते!हातगाडी वाले !
यांच्या किती माफक अपेक्षा असतात! आपल्या मुलीला
’ गारीगार ’खाऊ घालण्याचा हट्ट देखील फुगे विकणार्‍या बाईला पुरवता आला नाही.
त्याच्यासाठी तिला प्रत्येकासमोर हात पसरावे लागतात. विनवणी करावी लागते घास तोंडाशी आला असतानाच काळही तो घास हिरावून घेतो ! कशी असते नियती ? कसं असतं यांचं जगणं ? ती आईचा हात सोडून आनंदानं बर्फाच्या गाडीकडे जाणारी मुलगी समीरच्या डोळ्यासमोर सारखी दिसत होती. तो खूप बेचैन होता.माऊच्या हाकेनं त्याची विचारशृंखला तुटली.

दुसर्‍या दिवशी ऑफिसमधून येताना त्याच रस्त्याने तो आला. रस्त्याच्या कडेला बर्फाची गाडी होती, पण ती फुगे विकणारी बाई व तिची मुलगी त्याला कुठेच दिसली नाही.तो खूप निराश झाला. आपल्या मनाचा समाधान म्हणून समीरने गाडी पुसायला आलेल्या छोट्या मुलाला जवळच्या दुकानातील कुल्फी दिली. तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.

तेव्हापासून गाडी जवळ कोणीही छोटी मुलं काही वस्तू विकायला आली व  साएब,घ्या ना , असं म्हणू लागली की तो लगेचच गाडीची काच खाली करून त्यांच्या जवळची वस्तू खरेदी करतो आणि पैसे देऊन आपल्याजवळ असलेला बिस्किट पुडा, चॉकलेट त्यांना देतो. विक्रेत्या मुलांच्या डोळ्यातला आनंद बघून तो ही मनोमन सुखावतो.

’गारीगार ’ मागणार्‍या त्या मुलीचा चेहरा, ती आठवण मात्र सदोदित त्याला येते.’ बर्फगोळा ’ खाऊ घालताना तिच्या बरोबरीच्या हलाखीत जीवन जगणार्‍या एकातरी छोट्या मुलाला किंवा मुलीला तो अगदी न विसरता ’ गारीगार’
खायला देतो,तेव्हाच त्याच्या मनाचे समाधान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *