सीमा अहिरे : अफवांवर विश्वास ठेवू नये
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळत नाहीत किंवा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनीच सिलिंडर मिळतो, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सीमा अहिरे यांनी सांगितले की, पूर्वी गॅस बुकिंग नोंदणीची मुदत 21 दिवसांची होती. मात्र, सध्या ती 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या कालावधीनंतर ग्राहकांना ओटीपी प्राप्त होतो आणि ओटीपी मिळाल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसांत गॅस सिलिंडर वितरित केला जातो. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी करू नये किंवा घाईगडबड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे. केवायसी पूर्ण केल्यास गॅस सिलिंडर मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके स्थापण्यात आली आहेत. या पथकांकडून गॅस एजन्सी तसेच हॉटेल्सची नियमित तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 12 गॅस एजन्सी व 21 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळलेला नाही.
सध्या गॅस सिलिंडर जादा दराने विक्री होत असल्याबाबतही कोणतीही ठोस तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका किंवा तक्रार असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
– सीमा अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी