गॅस जपून वापरण्याचे सरकारचे आवाहन
नवी दिल्ली :
घरगुती गॅस वापरणार्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. गॅस जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता दोन सिलिंडर बुक करण्यामध्ये किमान 25 दिवसांचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गॅसचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.
युद्धामुळे एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. यामुळे हॉटेल, कंपन्यांसाठीच्या गॅसवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील 60 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांकडून साठा करण्याची किंवा हे सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यामुळे अचानक कंपन्यांनी आधीचा 15 दिवसांचा वेटिंग पिरिएड आता थेट 25 दिवसांवर नेऊन ठेवला आहे.
7 मार्चपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत. अनेकांकडे एकापेक्षा जास्त गॅस जोडणी आहेत. दोन सिलिंडर असलेल्यांकडे एक सिलिंडर रिकामा असतो. त्या ग्राहकांनी दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेव्हा 15 दिवसांचा मेसेज दाखविण्यात येत होता. परंतु 16-17 दिवस होऊनही सिलिंडर बुक होत नव्हता. अखेर 9 मार्चला कंपन्यांनी सिलिंडर डिलिव्हरीपासून 25 दिवसांचा गॅप असल्याचा मेसेज दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे एखादा ग्राहक 25 दिवसांच्या आत बुकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचे बुकिंग सिस्टिम स्वीकारणार नाही. गॅस सिलिंडर मागणीमुळे वाढलेला दबाव कमी करण्यासाठी कंपन्यांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.