गौतमी पाटीलने आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सबसे कातील अशी ही नृत्यांगना आता छोटा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहवर २६ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या शिट्टी वाजली रे कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील देखिल सहभागी होणार आहे. गौतमीचं नृत्यकौशल्य संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतच आहे. शिट्टी वाजली रे कार्यक्रमातून गौतमीचं पाककौशल्य पाहायला मिळणार आहे.
या भन्नाट कार्यक्रमाविषयी सांगताना गौतमी म्हणाली, ‘स्टार प्रवाह वहिनी माझ्या अत्यंत जवळची आहे. या वाहिनीने मला नवी ओळख मिळवून दिलीय. अल्पावाधितच या परिवाराने मला आपलसं करून घेतलं आहे. शिट्टी वाजली रे या कार्यक्रमातून माझं टीव्ही विश्वात पदार्पण होतंय असं म्हंटलं तरी चालेल. खरं सांगायचं तर मला जेवण बनवता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी नवा प्रयोग असणार आहे. त्यामुळे नवनव्या कलाकारांसोबत माझी स्वयंपाक घराशी नव्याने ओळख होणार आहे अशी भावना गौतमीने व्यक्त केली.’
शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे. मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणं मजेशीर ठरणार आहे. कारण कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पहातच असतो. मात्र त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य शिट्टी वाजली रे च्या मंचावरून पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल शिट्टी वाजली रे चा मंच करणार आहे. थोडक्यात काय पोटभर खायला घालणारी नाही तर स्वयंपाक करता करता पोटभर हसवणाऱ्या कलाकार जोडीचा शोध हा कार्यक्रम घेणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील. तेव्हा पाहायला विसरु नका शिट्टी वाजली रे २६ एप्रिल पासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.