कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्या- राजेंद्र फड
नाशिक :प्रतिनिधी डीझेलवरील कर कमी करण्यात यावे याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. याबाबत केंद्र शासनाने डीझेलवरील कर कमी करत काही अंशी दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही राज्यशासनाच्या वतीने डीझेलवरील कर समाधानकारक पद्धतीने कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळे डीझेलवरील कर कमी करून राज्यातील वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डीझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे महागाईचा फटका वाहतूकदारांसोबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना देखील बसत आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असलेली डिझेलची किंमत अधिक असल्याने महाराष्ट्रातील वाहतूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. डीझेलचे दर अधिक असल्याने त्याचा परिणाम भाडेवाढीवर होतो आहे. वाहतूक खर्चात अधिक वाढ होत असल्याने परिणामी महागाई अधिक वाढत आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला अधिक बसत आहे. एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय डीझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झाला असून त्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिक तसेच वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल व डीझेल वरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकदारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारकडून घेतला जाणारा पेट्रोल डीझेल वरील कर हा अधिक असल्याने वाहतूकदार अडचणीत आले आहे. त्यामुळे वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने डीझेल वरील कर कमी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात नुकतेच आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून डीझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करण्यात आलेली आहे.