ग्लोबल लीडर

 

सन २०१४ टी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट केले होते. निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. अर्थात, आघाडीतील एकट्या भाजपाला २७५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. भाजपाला मित्र पक्षांची तशी गरजही नव्हती. तरीही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना भाजपाने न्याय देत सरकारमध्ये स्थान दिले. पण, खर्‍या अर्थाने सत्ता भाजपाला मिळाली. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने मोदींना चिंता नव्हती. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विदेश दौर्‍यांवर भर देऊन विश्वभ्रमण मोहीम हाती घेतली होती. विविध देशांना भेटी देऊन त्यांनी जगाला भारताची संस्कृती, परंपरा आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडविले. यातून त्यांची जागतिक नेते म्हणून प्रतिमा निर्माण झाली. अर्थात, त्यांचा तसा हेतू होताच. जागतिक नेते म्हणजे ग्लोबल लीडर म्हणून त्यांचे स्थान कायम आहे. याच वर्षी भारतात जी-२० टी शिखर परिषद होत असून, या परिषदेच्या निमित्ताने मोदींना आपली जागतिक प्रतिमा आणखी उंचावण्याची संधीही मिळणार आहे. जागतिक स्तरावरील एक वजनदार नेते म्हणून त्यांचा गौरव होत असला, तरी देशातील विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेसकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन मोदींवर टीका केली. देशातील लोकशाही मरणपंथाला लागली असल्याचे वक्तव्य राहुल गांधींनी केले. यामुळे मोदींचा अवमान होण्यापेक्षा भारताचा अवमान झाल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. अदानी प्रकरणावरुनही राहुल गांधी मोदींना लक्ष्य करत आहेत. अदानींच्या बाबतीत भाजपा किंवा सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. ईडी, सीबीआयचा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला जाणारा वापर, न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न, महागाई असे अनेक मुद्देही विरोधक उपस्थित करत आहेत. सत्तेवर आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा वायदा, नोटबंदी हे मुद्दे जुने झाले, तरी विरोधक ते अधूनमधून उपस्थित करत आहेतच. अनेक मुद्यांवरून मोदींवर टीका केली जात आहे. या टीकेचा मोदींवर यत्किंचितही परिणाम झालेला नाही. विरोधकांना आक्रमक शैलीत मोदी उत्तर देऊन मोकळे होत आहेत. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मोदीं विरोधकांना लक्ष्य करत आहेत. आपली प्रतिमा मलिन करण्याची सुपारी काही लोकांनी देशात आणि विदेशात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे मोदी हेच ग्लोबल लीडर असल्याचा एक दिलासादायक अहवाल ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकन कंपनीने दिला आहे.

 

सुपारी दिल्याचा आरोप

 

मध्य प्रदेशात भोपाळ-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणी कमलापती रेल्वे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. आपली प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा अट्टहास आहे, त्यांनी त्यासाठी देशात आणि देशाबाहेरच्या काहींशी संगनमत करून ‘सुपारी’ दिली आहे, अशी टीका मोदी यांनी करताना काँग्रेसचा आणि राहुल गांधी यांचा उल्लेख टाळला. अर्थात, राहुल गांधी यांचे ‘भारतातील, लोकशाही धोक्यात’ हे ब्रिटनमधील वक्तव्य आणि त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अमेरिकेनंतर जर्मनीने केलेले भाष्य यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य आहे. आपल्या देशात असे काही लोक आहेत ज्यांनी २०१४ पासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा दृढनिश्चय केला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना ‘सुपारी’ दिली आहे. त्यांना काही लोक देशातून पाठिंबा देत आहेत, तर काही देशाबाहेरून काम करत आहेत, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर निशाणा साधल्याचे स्पष्टपणे दिसत असले, तरी त्यांच्या बोलण्यात बीबीसी वृतवीहिनीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट, अदानी समूहाच्या कंपन्यांविषयी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक सल्लागार कंपनीने दिलेला अहवाल, अमेरिकेतील वृत्तपत्रातूनही होणारी टीका, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अमेरिका आणि जर्मनीने दिलेल्या प्रतिक्रिया असे अनेक संदर्भ आहेत. विरोधक आणि विदेशातील काही मंडळी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. तो दूर करण्याचा मोदींचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. भारतातील विरोधकांची टीका एकवेळ मान्य करण्यासारखी आहे. पण, विदेशातून होणाऱ्या टीकेतून मोदींच्या प्रतिमेला निश्चित तडा जात आहे. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे सामर्थ्य जगाला दाखवून देण्याची संधी मोंदीना आयतीच चालू असताना विदेशातील काही मंडळी करत असलेल्या टीकेने पंतप्रधानांना आपल्या प्रतिमेची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि प्रत्येक भारतीय नागरिक मोदींचे संरक्षक कवच आहेत आणि हेच विरोधकांच्या डोळ्यांत खूपत असून ते माझ्या विरोधात नवनव्या युक्त्या योजत आहेत, असा मोदींचा दावा आहे. या लोकांनी आपली कबर खोदण्याची शपथ घेतली असल्याचे सांगत त्यांनी भानिकतेला हात घातला. अर्थात, त्यांनी ही वक्तव्ये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केली आहेत.

 

सर्वांत शक्तीशाली नेते

 

बीबीसीचा गुजरात दंगलीवरील माहितीपट, अदानी समूहाच्या कंपन्यांविषयी हिंडेनबर्गचा अहवाल, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशविदेशात उमटलेल्या प्रतिक्रिया, देशातील गढूळ झालेले धार्मिक आणि सामाजिक वातावरण आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी इत्यादी अनेक गोष्टी मोदींसाठी नकारात्मक असल्या, तरी तेच अव्वल ग्लोबल लीडर असल्याचे ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकन कंपनीने म्हटले आहे. हा एक प्रकारे मोदींना दिलासा आहे. या अमेरिकन कंपनीने ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्ट (जागतिक नेते मान्यता यादी) प्रसिद्ध केली आहे. त्यात मोदी पहिल्या स्थानावर असून, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही मागे टाकले आहे. या कंपनीने मोदींचे जागतिक नेत्यांमध्ये सर्वात शक्तिशाली नेते असे वर्णन केले आहे. ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाले, त्याच वर्षी म्हणजे २०१४ साली ही कंपनी सुरू झाली. या कंपनीचे काम जागतिक स्तरावर डेटा इंटेलिजन्सचे आहे. सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान आधारित ही कंपनी आहे. कंपनीच्या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकांवर आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा यांना पाचवे स्थान आहे. जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहाव्या, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सातव्या क्रमांकावर आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना आठव्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दहाव्या क्रमांकावर आहेत. या क्रमवारीचा विचार केला, देशविदेशातील काही लोक आपली प्रतिमा मलिन करत असल्याची चिंता करण्याचे कारण नसावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *