गोदाकाठी सूर्यास अर्घ्य देण्यासाठी गर्दी
पंचवटी : वार्ताहर
कार्तिक शुध्द चतुर्थीपासून सुरु झालेल्या छठ पर्वाच्या उपासनेतील षष्ठीचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सध्या नाशिकमध्ये राहत असलेले उत्तर भारतीय यात सहभागी झाले होते. मूळचे बिहार व झारखंड येथील नागरिकांकडून ही उपासना करण्यात आली. सायंकाळी त्यांनी गोदेच्या पात्रातील पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले. काही भाविक रात्रभर थांबून होते. तर काही पूजेनंतर घरी परतले. ही उपासना करणार्यांची रामकुंड परिसरात दुपारपासून गर्दी झाली होती. यावेळी गोदाघाटावर फटाक्यांच्या आतषबाजीसह सुरेल मैफल रंगली होती.
कोरोनामुळे दोन वर्ष उत्तर भारतीय बांधवांना गोदाकाठी छठ पूजा करण्यासाठी निर्बंध असल्याने पूजा करण्यात आली नव्हती . परंतु यावर्षी सर्वच निर्बंध हटविण्यात आल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आल्याने उत्तर भारतीयांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. होळकर पुलापासून थेट गौरी पटांगणापर्यंत दोन्ही काठावर भाविकांनी पूजा मांडली होती. ऊसाचे तोरण उभारून त्याच्याखाली सुप व बांबूच्या टोपल्यांमध्ये विविध प्रकारचे फळे ठेवण्यात आली होती. दिवे पेटवून व अगरबत्ती लावून सहकुटुंब पूजा करण्यात येत होती. दूध, तांदुळ, नारळ, लालसिंदूर, हळद, ऊस, अननस, सुथनी, भाजी आणि शकरकंदी, नाशपती, मोठा लिंबू, मध, पान, साबुत सुपारी, कैराव, कापूर, चंदन, मिठाई, प्रसादाच्या रूपात ठेकुआ, पालपुआ, खीर-पुरी, रव्याचा शिरा किंवा तांदळाचे लाडू आदी सामुग्री बांबूंच्या टोपलीत ठेवण्यात आली होती. सूर्यास अर्घ्य देताना प्रसाद सूपामध्ये ठेऊन दिवा लावण्यात येत होता. नदीच्या पाण्यात उतरून सूर्यास अर्घ्य दिले जात होते.
भाऊबीजेपासून तिसर्या दिवशी छठ व्रताचा आरंभ झाला. पहिल्या दिवशी सेंधवमीठ, तुपाने बनवलेले अरवा तांदुळ आणि कद्दूची भाजी प्रसाद रुपात चढविण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशीचा उपवास सुरु झाला. या दिवशी रात्री खीरीचा प्रसाद व्रतधारींनी ग्रहण केला. तिसर्या दिवशी मावळत्या सूर्यास अर्घ्य म्हणजे दूध अर्पण करण्यात आले. अंतिम दिवशी उगवत्या सूर्यास जल रुपी अर्घ्य देण्यात आले.
छठपूजेसाठी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री संत गाडगे महाराज कनौजिया धोबी समाज संस्थेच्या वतीने याठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना मोफत चहा वाटप करण्यात आले होते.उत्तर भारतीय बांधवांसाठी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे भोजपुरी प्रिया म्युझिकल ग्रुपचा मनोरंजनासाठी ऑर्केष्ट्रा ठेवण्यात आला होता. यामध्ये देवी आणि सूर्य देवता उपासना असे मराठी,हिंदी व भोजपुरी गीते सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी छठ समिती अध्यक्ष गोविंद झा, महंत भक्तिचरणदास महाराज, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,धनंजय बेळे,संदीप पाटील,कृष्णकुमार नेरकर,रावसाहेब कोशिरे,देवांग जानी,नंदकुमार मुठे,द्वारका तिवारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उमापति ओझा, हिरालाल परदेशी, सुभाष अग्रहरी , अजय यादव, प्रकाश चौहान, प्रशांत पाटील, रवि सोनार,संजय शर्मा,जनार्दन शर्मा,रविंद्र पंडित, रविरंजन शर्मा, प्रेमनाथ प्रजापती,आर्यन तिवारी, प्रेमशंकर विश्वकर्मा, रवींद्र गुप्ता,चंद्रकांत पाटील,उमेश सिंग,सचिन चौघुले,संतोष कोकाटे,मदन जाधव यांनी अथक परिश्रम घेतले आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गेली दोन वर्ष कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे नदीच्या पात्रात येऊन सूर्यास अर्घ्य देणे शक्य झाले नसल्याने यावर्षी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दुपारपासून रामकुंड व गंगाघाट परिसराकडे येणारे रस्ते बॅरिकेट्स लावून वाहनांसाठी बंद केले होते. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.