उद्घाटनापासून गोदापार्क कुलूपबंदच

काँग्रेस सेवा दलाचा महापालिकेला इशारा

नाशिक : प्रतिनिधी
गोदा पार्क त्वरित सुरू करावा, अन्यथा नाशिक शहर काँग्रेस सेवा दल कुलूप उघडून जनतेसाठी सुरू करून देईल, असा इशारा डॉ. वसंत ठाकूर यांनी दिला आहे.
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामध्ये अनेक कामे हाती घेण्यात आली होती. याच कामाचा एक भाग म्हणून गोदावरी तीरावर असलेल्या घारपुरे घाट येथे गोदा पार्क तयार करण्यात आला होता. सुमारे 17 कोटी रुपये खर्च करून हा गोदा पार्क तयार करण्यात आला. मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. परंतु औपचारिक स्वरूपात उद्घाटन करून हा गोदा पार्क नागरिकांना खुला करणे अपेक्षित असताना आजही तो बंद स्थितीत धूळखात पडून आहे. अशाच प्रकारे स्मार्ट सिटीने शहरांमध्ये 21 प्रकल्प हाती घेतले होते. ते प्रकल्पही वादाच्या भोवर्‍यात अडकले असून, अशाप्रकारे नाशिककरांची स्मार्ट सिटी कंपनीने व नाशिक महानगरपालिकेने थट्टा सुरू केली आहे.
ती त्वरित थांबवावी आणि सर्व 21 प्रकल्पांची कामे जनतेसमोर मांडावी, अशी वारंवार मागणी करूनही त्याची दखल स्मार्ट सिटी घेत नाही. अशाच प्रकारे अनेक नागरिकांनी तक्रारी अर्ज करून देखील महानगरपालिका व स्मार्ट सिटीला जाग येत नसल्याने हा गोदा पार्क येथे आठ दिवसांत नागरिकांसाठी खुला केला नाही तर नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना व नाशिककरांना घेऊन त्याचे कुलूप तोडण्यात येईल, याची दखल संबंधित स्मार्ट सिटीने व नाशिक महानगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *