गोदावरी घेणार मोकळा श्वास

पाणवेली काढण्याचे काम अंतिम टप्प्यात

निफाड : प्रतिनिधी
तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी बस्तान बसविल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागत होता. परिणामी पाटबंधारे विभागाने आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने एक मेपासून पाणवेली काढण्यास सुरुवात केली. हे काम अंतिम टप्प्यात आल्याने गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.
गंगापूर आणि दारणा धरणापासून वाहणार्‍या गोदावरी दारणा नद्यांचे पाण्याबरोबर नाशिकचे सांडपाणीदेखील वाहत येते. चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगव, कोठुर, करंजगाव, नांदूरमध्यमेश्वर धरण, त्यानंतर नांदूरमध्यमेश्वर, तारुखेडले, तामसवाडी आदी गावांच्या परिसरातून वाहणार्‍या नदीपात्रात पानवेलींनी बस्तान बसविले होते. तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी देखील वेळोवेळी या पाणवेलींची वेळोवेळी पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याचे तसेच विधिमंडळात त्यावर चर्चा झाली.
परिणामी गोदावरी विकास महामंडळ आणि पाटबंधारे विभाग यांनी चांदोरी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांच्या मदतीने आणि बोटीचा आधार घेत या पाणवेली काढण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आजच्या परिस्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पर्यावरणप्रेमींनी मानले आभार

पावसाळ्यापूर्वी पाणवेलींचा प्रश्न निकाली निघणार असल्याने गोदावरी नदी मोकळा श्वास घेऊ लागली आहे. यापूर्वी पानवेली काढण्याऐवजी त्या खालील नदीपात्रात ढकलून दिल्या जात असल्याने त्या पाण्याबरोबर खाली वाहत येत असे. विशेषतः सायखेडा, चांदोरी, करंजगाव, कोठुरे, नांदूरमध्यमेश्वर धरण आदी ठिकाणी नदीपात्रात पाणीच दिसत नसे. जिकडे बघावे तिकडे पाणवेलींचे प्रस्थ. मात्र, आता प्रत्यक्ष पानवेली काढण्याची मोहीम हाती घेत ती अंतिम टप्प्यात आणल्याने परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी यांनी प्रशासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *