बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील आडकेनगर भागात चोरट्यांनी बंद बंगल्याची खिडकी कापून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत सोने-चांदीचे दागिने, विदेशी चलन व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीनाथ मंगू विसपुते (रा. गणाधीश बंगला नं. 12, आडकेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घर बंद करून बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी डायनिंग रूममधील लोखंडी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने, विदेशी चलन व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख 46 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील सहा जोड, 3 ग्रॅम वजनाचा सोन्याचा लहान वेडा, 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे, विविध चांदीच्या मूर्ती, चांदीची पायातील साखळी, जोडवे, तसेच युरो चलनातील नाणी व 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *