गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांची संयुक्त कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
बसस्टॉप परिसरात गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेला लुटणार्या सराईत टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दिंडोरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.
दि. 28 ऑगस्ट रोजी दिंडोरी बसस्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेला सोन्याची माळ हिसकावून पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक सुशांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या टोळीचा शोध घेतला. तपासात टोळीतील सदस्य महिला असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी महिला लिलाबाई बनसोडे (रा. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावल्याची कबुली दिली. तिच्या माहितीवरून पोलिसांनी तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला स्कूटी वाहन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात भा.दं.सं. कलम 379, 34, 412 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक आदित्य कर्डिले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत शेंडे, पोलीस निरीक्षक रामदास सुतार, सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाकुडे, पोलीस हवालदार सुरेश बाळके, विजय गायकवाड, लहू टिके, ललिता शिरसाट, हेमंत गिर्हाळे, प्रदीप बर्हाडे, प्रदीप शिंदे आदींचा सहभाग होता.