बंद घरात घरफोडी; 9 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्‍या महिलेच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील संजीवनीनगर येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करणार्‍या महिलेच्या बंद घरात घरफोडी करत चोरट्यांनी नऊ तोळ्यांचे दागिने आणि रोकड मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.4) दुपारी 3 ते रात्री 9 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अंजना सुरेश दराडे (वय 60) यांनी सिन्नर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजना दराडे शहरातील संजीवनीनगर येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी घर बंद करून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्या भाजीपाला व्यवसायासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या जिन्यातील लाकडी प्लायवूड वाकवून घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर कपाट आणि अलमारीची उचकपाचक करून घरातील किमती ऐवज घेऊन पोबारा केला. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही महिला घरी परतली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. 90 हजार रुपये किमतीच्या तीन तोळे वजनाचे सोन्याचे पुतळ्याचे गंठण, 30 हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची नथ, 45 हजार रुपये किमतीची 1.5 तोळे वजनाची सोन्याची चेन, 30 हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे कानातील झुबे, 10 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 45 हजार रुपये किमतीचे 1.5 तोळे वजनाची दोन वाट्या असलेले मणी मंगळसूत्र, 7 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान, 38 हजार रुपये किमतीचे 01 तोळे वजनाचे सोन्याचे पेंडल 20 हजार रुपये किमतीचे 130 ग्रॅम चांदीचे दागिने. त्यात पायातील मासोळ्या, हातातील कडे, सरी, बिनले, पायातील जोडे अशा नऊ तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. याशिवाय सहा हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली. जुन्या बाजारभावानुसार तीन लाख 13 हजार रुपयांची चोरी झाल्याची नोंद सिन्नर पोलिसांत करण्यात आली आहे. सोन्याच्या सध्याचा बाजारभावाचा विचार करता किमान दहा लाखांचा फटका या महिलेला सहन करावा लागला आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खैरनार करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *