घरबसल्या रोजगाराची सुवर्णसंधी

पोस्ट ऑफिसकडून गृहिणींना तात्पुरते काम

नाशिक : अक्षय निरभवणे
घर सांभाळत आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असलेल्या अनेक गृहिणींना पोस्ट ऑफिसकडून दिलासा देणारी संधी उपलब्ध झाली आहे. पोस्ट विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात गृहिणींना काम देण्यात आले असून, या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचा आधार मिळत आहे. विशेष म्हणजे, हे काम गृहिणींना घरबसल्या करता येत असल्याने या संधीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
पोस्ट ऑफिसकडून देण्यात येणार्‍या या कामामध्ये पोस्टकार्डवर क्लिप ठोकणे व त्यांची योग्य पद्धतीने मांडणी करणे, असे स्वरूप आहे. हे काम सोपे, कमी वेळेत पूर्ण होणारे आणि कोणतेही विशेष प्रशिक्षण न लागणारे असल्यामुळे गृहिणी मोठ्या उत्साहाने या कामात सहभागी होत आहेत. घरकाम आणि कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांभाळूनही महिलांना हे काम करता येत असल्याने त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरत आहे.
सध्या निवडणूक व प्रशासकीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टकार्ड व इतर साहित्याच्या कामाचा ताण वाढला आहे. यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून, त्यासाठी गृहिणींना तात्पुरत्या स्वरूपात काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे एकीकडे पोस्ट विभागाचे काम सुलभ झाले आहे, तर दुसरीकडे गृहिणींना रोजगार मिळाला आहे. या कामाच्या मोबदल्याबाबतही गृहिणींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जरी हे काम तात्पुरत्या कालावधीसाठी असले, तरी घरबसल्या मिळणारे उत्पन्न अनेकांसाठी आधार ठरत आहे. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना या माध्यमातून थोडाफार दिलासा मिळत आहे.

उपक्रम सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा

गृहिणींनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, घराबाहेर न जाता सन्मानाने काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. तसेच महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रशासनाने दाखवलेला विश्वासही महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एकूणच पोस्ट ऑफिसकडून राबवण्यात येणारा हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत असून, गृहिणींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Golden opportunity for work from home

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *