आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी दीपाली रवींद्र पैठणकर (वय 35) यांच्या नव्याने घेतलेल्या रो-हाउस क्र. 19 मधून ही चोरी झाली आहे. या घराचे कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत 55 इंची सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, चांदीच्या पूजासाहित्य वस्तू, कुकरचे तीन सेट, पितळी समया आणि भांडी, हायर कंपनीचा वॉटर फिल्टर, भारतीय सैन्यदलाच्या वर्द्या, तसेच वास्तुशांतीसाठी मिळालेल्या भेटवस्तू असा एकूण सुमारे 83 हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार राकेश बनकर करीत आहेत.