डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
२०२३ ची आयसीसी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज त्या चषकासाठी अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अहमदाबादेत होत आहे. भारताने या स्पर्धेत कमालीचे प्रदर्शन केले आहे. भारताचे अनेक खेळाडू फुल फॉर्म मध्ये आहेत. विशेष म्हणजे भारताने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत, आपले सर्वच्या सर्व सामने जिंकले आहे व तेही अगदी सहजपणे.
एकही सामना अटीतटीचा झाला नाही किव्हा नशिबाची साथ मिळाली म्हणून जिंकला, असेही झाले नाही. ही स्पर्धा अनेक बाबींसाठी स्मरणात राहील. दोन वेळचे जगज्जेती वेस्ट इंडिजची टीम या स्पर्धेत दिसलीच नाही. गत विजेता इंग्लंडचा संघ पॉईंट्स टेबलच्या तळाशी राहिला. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या आशियायी संघांना अंतिम चार मध्ये स्थान मिळवता आले नाही.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड कसेबसे उपांत्य सामान्यांपर्यंत पोहोचू शकले. भारताच्या वतीने प्रत्येक खेळाडूने आपापले योगदान देऊन, खऱ्या अर्थाने सांघिक खेळ केला आहे. अनेक विक्रम मोडीत काढले आहे. भारताच्या व्यतिरिक्त इतर अनेक नवीन टिम्सने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्थान, बांगलादेश, नेदरलँड सारख्या संघांनी चांगली लढत देऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली.
माझ्या मते, ही स्पर्धा एका वेगळ्याच कारणासाठी स्मरणात राहणार आहे. क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर, याचे रेकॉर्ड्स मोडीत निघतांना आपण पाहिले आहे. किंग कोहली ने एकदिवसीय सामन्यातील सचिनच्या शतकांची बरोबरी केली, व पन्नासावे शतक ठोकून सचिनला मागे टाकले. त्याचप्रमाणे, सचिनच्या नावे दोन दशके अबाधित असलेला आणखी एक विक्रम विराटने मोडला.
एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने मोडला असून आता एका स्पर्धेत सातशेहुन अधिक धावा करणारा कोहली हा एकमेव खेळाडू झाला आहे. अजून अंतिम सामना बाकी आहे, आणि यात त्याने शतकी खेळी केली तर तो आठशेच्या पार जाऊ शकतो. आत्ताच त्याचे पन्नास शतके झाले आहे, आणि तो आताही चांगला खेळतो आहे, आणि भविष्यातही काही वर्षे तरी अजून खेळणार आहे. तेव्हा तो सचिनच्या किती पुढे जाणार, याचा अंदाज न लावलेलाच बरा, असे तज्ञांचे मत आहे.
त्याने सचिनपेक्षा खूप कमी सामने खेळले असून जेव्हा सचिन इतके सामने खेळेल, तेव्हा तो कुठल्याकुठे पोहोचेल अशीही चर्चा होत आहे. खऱ्या अर्थाने किंग कोहली हाच गोट आहे. अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स (GOAT).
दोघेही ग्रेटच आहेत, यात काही वाद नाही. परंतु, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स म्हणजे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ कोण, कारण ग्रेटेस्ट हा एकच कुणीतरी असू शकतो. या विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. सचिनची वन डे कारकीर्द १९८९ पासून ते २०१२ अशी एकूण २३ वर्षांची. त्यातील पाहिले सात वर्षे म्हणजे १९९६ पर्यंत भारताच्या फलंदाजीची भिस्त एकट्या सचिनवर होती.
१९९६ च्या वर्ल्ड कप मध्ये ५०० धावांचा टप्पा पार करणारा सचिन पहिला फलंदाज होता. त्याने त्या स्पर्धेत ५२३ धावा केल्या होत्या, त्याच्या खालोखाल १७८ धावा नवज्योतसिंग सिधूच्या नावे होत्या. यावरून कळते की सचिनवर आपण किती अवलंबून होतो. अझर, जडेजा, कांबळी, मांजरेकर यांच्या एकत्रित धावा देखील सचिनपेक्षा कमी होत्या.
त्यानंतर द्रविड, गांगुली, लक्ष्मण ची भारतीय टीम मध्ये एन्ट्री झाली. पुढे २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये सचिनने सहाशेचा टप्पा ओलांडला. तेव्हा त्याने केलेला ६७३ धावांचा विक्रम कालपरवापर्यंत, म्हणेज दोन दशके अबाधित होता. १९९८ मध्ये शरजाहतील वादळानंतरच्या त्या दोन वादळी खेळ्या, कुणी कसं विचारू शकतं? भारताला एकहाती अंतिम सामन्यात घेऊन जाणं आणि अंतिम सामनाही जिंकून देणाऱ्या त्या अजरामर खेळीने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला शारजाहच्या वाळवंटातील धूळ चारली होती.
याही पलीकडे खूप साऱ्या सामन्यात सचिनच्या बॅटने चांगल्या चांगल्यांना पाणी दाखवले आहे. वन डे मधील पहिला द्विशतकवीर होण्याचा मान सचिनला आहे. त्याने आपली योग्यता सिद्ध केलेली आहे, म्हणून तर त्याला “ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स” च्याही पालिकडली “गॉड ऑफ क्रिकेट” ही पदवी त्याच्या चाहत्यांनी देऊ केलेली आहे. आताचे क्रिकेट हे बॅटिंग फ्रेंडली झाले आहे.
विशेष करून गेल्या दहा वर्षात बरेच बदल झालेले आहे. बॅटिंग धार्जिनी पिच बनवणे, फिल्डिंगचे निर्बंध, ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा परिणाम यामुळे आता पन्नास षटकात तिनशेचा टप्पा सहज पार केला जातो. द्विशतकही अनेकांनी केले आहे. त्या काळी संपूर्ण संघाला मिळून दोनशे-अडीचशे करणेही अवघड होते. त्यात भर म्हणून वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया या संघाची भेदक गोलंदाजी. आजच्या तुलनेत त्यावेळची परीस्थिती वेगळी होती, भारतीय खेळाडू आणि भारतीय प्रेक्षकांची मानसिकताही वेगळी होती.
२००३ मध्ये गांगुली कॅप्टन झाल्यानंतर भारतीयांमध्ये हळू हळू आक्रमकता आणि आत्मविश्वास येऊ लागला. परंतु, सचिनने त्याही खूप आधीपासून आपल्या बॅट मधून आक्रमकता दाखवली होती. तंत्रशुद्ध फटकेबाजी कशी करावी हे सचिनने दाखवले. यामुळेच सुरवातीला त्याला “मास्टर ब्लास्टर” म्हणायचे. सचिनवर लाखो करोडो भारतीयांच्या तसेच संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे एक मोठे ओझे होते. ओपनिंगला येऊन सर्व स्ट्राईक बोलर्सला सामोरे जाणे, त्या तिखट माऱ्याला बोथट करणे, रन रेट चांगला ठेवणे, भारताच्या अशा पल्लवित ठेवणे आणि जास्तीत जास्त काळ खेळणे ही आव्हाने सचिनने अनेकदा पेलले. अशा स्थितीत सचिनने आपली कारकीर्द गाजवली. तो खेळत राहिला, विक्रम होत गेले.
आताच्या काळात विराट कोहली सचिनच्या जवळ येऊन पोहोचला आहे, आणि वन डे शतकांच्या बाबतीत त्याने सचिनला मागेही टाकले आहे. तेही, केवळ १७६ वन डे मध्येच ही मजल गाठणे हे विशेष आहे. सचिनला चारशेहून अधिक सामने खेळावे लागले, ही विराटची जमेची बाजू आहे. मैदानावरील त्याचा फिटनेस, त्याची आक्रमकता आणि इतर खेळाडूंना प्रोत्साहन त्यामुळे तो नेहमीच गेममध्ये इनव्हॉल्व्ह असतो. त्याच्या बॅटिंगची खासियत अशी की धावांचा पाठलाग करतांना तो त्याची खेळी खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करतो.
सुरवातीला एकेरी दुहेरी धावा घेत रन काढतो, त्यामुळे तो दडपण येऊ देत नाही. हळू हळू रन रेट वाढवतो आणि शेवटी आक्रमक होतो. त्याने आजवर अनेकवेळा यशस्वी पाठलाग करून भारताला विजय मिळवून दिलेला आहे. म्हणूनच त्याला “चेज मास्टर” म्हंटले जाते. त्याची फिल्डिंग तर अल्फातूनच आहे. चपळता, लक्षभेदी थ्रो, कल्पकता आणि आक्रमकता त्याला इतर खेळाडूंपासून वेगळे करते. मॉडर्न गेमसाठी ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या सर्व विराटमध्ये बघायला मिळतात. तो असाच भारतासाठी पुढील अनेक वर्षे खेळो, हीच माझी, तुमची आणि सर्व भारतीयांची अपेक्षा आहे, नाही का?
दोघांमध्ये बऱ्याच गोष्टींचे साम्य आहे. खास करून देशासाठी आणि जिंकण्यासाठी खेळणे, ही दोघांचीही प्राथमिकता असते. वयक्तिक विक्रम, वयक्तिक टप्पे गाठणे, किव्हा आपले महत्व वाढवणे हे दोघांनीही कधी केले नाही. सचिन विराटचा गुरू, आयडॉल आहे, आणि विराट सचिनचा शिष्य, फॅन, फॉलोवर आहे. दोघांनीही आपापली भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. दोघांची एकंदर कारकीर्द बघितली तर त्या दोघांच्यात थोडासा फरक आहे. सचिनच्या चोवीस वर्षांच्या काळात कधीही कुठलीही वादग्रस्त घटना घडली नाही.
त्याने गेमचे स्पिरिट पाळून खेळ केला. अनकेदा आऊट नसतांना आंपायर्स ने आऊट दिले तरी काही प्रतिक्रिया दिली नाही, आणि आउट असेल तर आंपायर्सच्या निर्णयाची वाट न बघता तो पॅवीलिऑनची वाट धरायचा. त्याने सर्वांचा आदर केला, म्हणून प्रत्येक देशातील खेळाडू आणि दर्शक त्याचे चाहते झाले. आपल्या टीकाकारांना त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. कुठेही त्याने वादग्रस्त विधान केले नाही. अनेक वेळा दुखापत झालेली असतांना तो देशासाठी खेळला. २००३ च्या वर्ल्डकप दरम्यान वडिलांचे निधन झाले असतांनाही देशाला त्याची गरज म्हणून तो वयक्तिक दुःख बाजूला सारून देशासाठी खेळला.
अंगी नम्रपणा, मृदू भाष्य, हासरा चेहरा, संघातील इतरांना मदत आणि मार्गदर्शन, लाखो तरुण आणि होतकरू क्रिकेटवीरांचे आदर्श, करोडो भारतीयांचे विश्वासू आशास्थान, मूर्तिमंत आदरास्थान, सर्वांच्या गळ्यातील ताईत… ही विशेषणे फक्त देवासाठीच लागू होतात. म्हणूनच, सचिन हा “गॉड ऑफ क्रिकेट” आणि विराट हा आकड्यांवर आधारित क्रिकेटमधील “ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स”. अशी ही दोघे… एक गॉड आणि दुसरा गोट. दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो, आणि भविष्यात जगभरातील लाखो करोडो क्रिकेट प्रेमींच्या करमणूक करत राहो, हीच सदिच्छा…!
|