शासनाचा 20 कोटींचा निधी वारकरी सुविधांसाठी वापरावा
निवृती नाथ संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे जिप ला निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे २० जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सुमारे पन्नास वेगवेगळ्या दिंड्या व त्यातील सुमारे ४० हजार वारकरी यांच्या मूलभूत सेवा सुविधांसाठी निवृत्तीनाथ संस्थांनने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान निर्मलवारीसाठीचा आणि एकूणच वारकऱ्यांच्या विविध गरजांचा विचार करून शासनाने२० कोटींचा निधी महाराष्ट्रातील संत मुक्ताबाई संस्थान संत सोपान काका तसेच संत निवृत्तीनाथ संस्थानला दिला आहे. हा निधी लवकरात लवकर वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी वापरला जावा व त्यासाठीचे प्रस्ताव शासनाने तयार करावेत यासाठीची संस्थांच्या विश्वस्त मंडळाची बैठक प्रकल्प संचालक तथा नोडल अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या दालनात काल ( ता.२७) पार पडली. वीस कोटी या एकूण निधी पैकी निवृत्तीनाथ संस्थांच्या वाट्याला सात कोटीच्या जवळपास निधी येत असल्याने एवढ्या निधीत कोणकोणती मूलभूत कामे करायची या मागण्यांचे सविस्तर निवेदन निवृत्तीनाथ संस्थानतर्फे नोडल अधिकारी संगमनेरे यांना देण्यात आले.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने वारकऱ्यांसाठी पाच पाण्याचे टँकर, तीन रुग्णवाहिका आरोग्य पथके तसेच पाऊस पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी निवारा शेड पालखीतळावर लाईटची व्यवस्था तसेच ज्या मार्गावरून पालखी सोहळा जातो त्या मार्गावर अनेक अनेकदा लाईट नसते अशावेळी त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा, महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्नानगृह स्वतंत्र शौचालय, तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या रथावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तसेच जीपीएस सुविधाही अमलात आणण्यासाठी प्रस्ताव संस्थांकडून देण्यात आले आहेत.
या प्रस्तावावर सविस्तरपणे चर्चा नोडल अधिकाऱ्यांशी करण्यात आली निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला वारकऱ्यांचा निधीबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या नोडल अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिली. या बैठकीसाठी संस्थांनचे सचिव अमर ठोंबरे, संस्थांनच्या विधी व अर्थ विभागाचे समन्वयक तथा विश्वस्त एड. सोमनाथ घोटेकर, जीर्णोद्धार समितीचे मुख्य समन्वयक तथा माजी अध्यक्ष निलेश गाढवे पाटील ,पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ, राहुल साळुंखे, माजी विश्वस्त पुंडलिकराव थेटे आदी उपस्थित होते.