खडांगळीत बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी
सिन्नर : प्रतिनिधी
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 7) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास
खडांगळी शिवारात घडली. दरम्यान, आजीने केलेल्या प्रतिकारामुळे बिबट्याच्या तावडीतून मुलाची सुटका झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. शिव संपत भोेेस (वय 6 वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. आजी लंकाबाई पंढरीनाथ भोेस (वय 75) यांनी सर्वस्व पणाला लावत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका करत त्याचा जीव वाचवला. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
खडांगळी-पंचाळे शिवरस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात संपत भोस यांची वस्ती आहे. तेथून काही अंतरावर त्यांचा एक भाऊ वास्तव्यास आहे. या भावाकडे त्यांचा मुलगा शिव सकाळी खेळण्यासाठी गेला होता. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांची आई लंकाबाई त्यास हाताशी धरून वस्तीवर परतत असताना सरपंच कल्पना नवनाथ ठोक यांच्या वस्तीजवळ सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर झडप घातली. यावेळी आजीने तातडीने प्रसंगावधान राखत सर्वशक्तिनिशी बिबट्याचा प्रतिकार करत त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. त्यानंतर जोराने आरोळी ठोकत मदतीसाठी धावा केला.
स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या दुसर्या बाजूला असलेल्या सोयाबीनच्या शेतात धूम ठोकली. मुलाच्या पाठीला बिबट्याच्या पायाची नखे लागल्यामुळे तो जखमी झाला. त्याला तातडीने प्रारंभी वडांगळी येथील खाजगी दवाखान्यात आणि नंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्यासह टीमने जिल्हा रुग्णालयात जात जखमी मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरी, वॉचमन मधुकर शिंदे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने या भागात पिंजरा लावण्यात आला आहे. तिथून दीड किलोमीटर असलेल्या धनगरवाडी शिवारातही बिबट्याला पकडण्यासाठी दुसरा पिंजरा लावण्यात आला आहे.